

देवळाली कॅम्प : उन्हाची तीव्रता वाढत असून, अन्नपाणी व भक्ष्याच्या शोधात बिबटे गावातून घरापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे संपूर्ण दारणा काठच परिसर दहशतीत आला आहे. नानेगाव येथील शिंदे मळ्यात सहावा बिबट्या जेरबंद करण्यात आला. परंतु लोहशिंगवे व लहवित परिसरात बिबट्यांचे दर्शन होत असल्याने तेथील ग्रामस्थ भीतीखाली वावरत आहे.
नाशिक तालुक्यातील दारणा पट्ट्यात असलेल्या नानेगाव, शेवगे दारणा, लहवित, वंजारवाडी, राहुरी, दोनवाडे, संसरी, पळसे, बेलतगव्हाण या पट्ट्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढली आहे. सध्या उन्हामुळे जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने तहानलेल्या बिबट्यांनी आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळवला आहे. 8 मार्चला नानेगाव येथील शिंदे वस्तीजवळ धुमाकूळ घातलेला बिबट्या जेरबंद केल्यानंतर अवघ्या 20 दिवसांत दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात आला. गेल्या आठ दिवसांपासून मनोहर शिंदे यांच्या गट नंबर 434 मध्ये बिबट्याचे वास्तव्य होते. या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावला होता. गुरुवारी (दि. 27) पहाटेच्या सुमारास बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना अलगद पिंजऱ्यात जेरबंद झाला. जेरबंद होताच बिबट्याने डरकाळ्या फोडल्याने परिसर दणाणून गेला होता. मनोहर शिंदे यांनी याबाबत वनविभागाला कळवले. गुरुवार सकाळी वनविभागाचे अधिकारी विजयसिंह पाटील, अशोक खांजोडे, अंबादास जगताप आदींच्या टीमने घटनास्थळी येऊन बिबट्याला रेस्क्यू केले. पिंजऱ्यासह बिबट्याला गंगापूररोड रोपवाटिका येथे हलविण्यात आले.
दारणा पट्ट्यात वारंवार बिबट्यांची संख्या वाढत असून, नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. वनविभागाने या परिसरात कायमस्वरूपी पिंजरा ठेवावा, अशी मागणी नाणेगावचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, मनोहर शिंदे, राजाराम शिंदे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.
नाशिक तालुक्यात बिबट्यांची संख्या सातत्याने वाढत असून, नानेगाव येथे गेल्या वर्षभरात सहावा बिबट्या जेरबंद केला आहे. पकडलेला बिबट्या नऊ ते दहा वर्षांचा प्रौढ असून, लोहशिंगवे व लहवित येथेही पिंजरा लावण्यात येत आहे
विजयसिंह पाटील, अधिकारी वनविभाग, नाशिक
दरम्यान, दिंडोरी मध्ये शिंदवडला जखमी बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. जखमी बिबट्याने वन कर्मचारी यांच्यावर हल्ला केला असून दोघे जखमी झाले आहेत.