

सतीश डोंगरे
नाशिक : यकृताला (लिव्हर) होणारा हिपॅटायटिस हा जगातील सर्वाधिक दुर्लक्षित पण जीवघेण्या संसर्गजन्य आजारांपैकी एक आहे. अनेक रुग्णांना वर्षानुवर्षे कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे याला 'सायलेंट किलर' म्हटले जाते. भारतात या आजाराने तब्बल ३.४५ कोटी नागरिक ग्रस्त असून, महाराष्ट्रात या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रात 'हिपॅटायटिस-सी'च्या रुग्णांची संख्या अवघी १,३३९ इतकी होती.
२०२४-२५ मध्ये ही संख्या थेट ९,४७६ इतकी झाली आहे. अवघ्या तीनच वर्षांत तब्बल सात पट रुग्णसंख्या वाढल्यामुळे या आजाराच्या निर्मूलनाचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, भारतात सुमारे २.९ कोटी नागरिक हिपॅटायटिस-बी, तर ५५ लाख नागरिक हिपॅटायटिस-सी संसर्गासह जगत आहेत. जागतिक स्तरावर २०२२ मध्ये १३ लाखांहून अधिक मृत्यू हिपॅटायटिस-बी आणि सीमुळे झाल्याची नोंद आहे. अजूनही दरवर्षी लाखो नवे रुग्ण आढळत असल्यामुळे हा आजार मोठे आव्हान ठरत आहे.
केंद्र सरकारने २०१८ मध्ये राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम सुरू केला असून, २०३० पर्यंत हिपॅटायटिस-सीचे निर्मूलन आणि हिपॅटायटिसमुळे होणारे मृत्यू व संसर्ग मोठ्या प्रमाणात कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम २८ जुलै २०१९ पासून हाती घेण्यात आला आहे.
राज्यात ४ मॉडेल ट्रीटमेंट सेंटर आणि ३२ ट्रीटमेंट सेंटर कार्यरत असून, प्रत्येक जिल्ह्यात हिपॅटायटिस बी व सीचे निदान आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 'हिपॅटायटिस-सी'वरील प्रभावी औषधामुळे महाराष्ट्रात या आजारावर नियंत्रण आणण्यास मदत झाली असली, तरी 'हिपॅटायटिस-बी'चे आव्हान कायम आहे.
सतत थकवा
भूक मंदावणे
मळमळ
उलटी
कावीळ
गडद पिवळे मूत्र
पोटदुखी
भारतात ३.४५ कोटी 'हिपॅटायटिस बी व सी'ग्रस्त
२.९ कोटी 'हिपॅटायटिस-बी'चे रुग्ण
५५ लाख 'हिपॅटायटिस-सी'चे रुग्ण
२०२२ मध्ये जगभरात १३ लाख रुग्णांचा मृत्यू हिपॅटायटिसमुळे
२०३० हिपॅटायटिस निर्मूलनाचे जागतिक लक्ष्य
२०२१-२२ मध्ये १,३३९ 'हिपॅटायटिस-सी' रुग्णांची नोंद
२०२४-२५ मध्ये ९,४७६ 'हिपॅटायटिस-सी' रुग्णांची नोंद
राज्यात ४ मॉडेल उपचार केंद्रे
राज्यात ३२ उपचार केंद्रे
निर्जंतुक न केलेल्या सुया व इंजेक्शन
असुरक्षित लैंगिक संबंध
संक्रमित आईकडून बाळाला
दूषित अन्न व पाणी
"हिपॅटायटिसचे वेळेवर निदान आणि उपचार झाल्यास गंभीर परिणाम टाळता येतात. विशेषतः 'हिपॅटायटिस-बी'साठी लसीकरण आणि 'हिपॅटायटिस-सी'साठी वेळेवर उपचार हेच सर्वात प्रभावी शस्त्र आहे."
— डॉ. सुनील ठाकूर, वैद्यकीय अधिकारी, एआरटी सेंटर, जिल्हा रुग्णालय