

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आयाराम-गयारामांना तिकीट देणे असो वा, पक्षांतर्गत कलह असो पदाधिकाऱ्यांनी मनातील तीव्र भावनांना वाट मोकळी करून देत खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. खा. शिंदे यांनीदेखील तब्बल अडीच तास कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर्गत मनभेद आणि मतभेद असल्याची कबुली देताना, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत यश हवे असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरजही खा. शिंदे यांच्यासमोर बोलून दाखविली.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. शिंदे यांच्या उत्तर महाराष्ट्रातील 'शिवसंवाद' दौऱ्याला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. इगतपुरी आणि देवळाली मतदारसंघातील पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यासाठी हॉटेल एक्स्प्रेस इन येथे आयोजित बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
या प्रसंगी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख तथा आमदार सुहास कांदे, उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, आनंद परांजपे, योगेश म्हस्के आदी उपस्थित होते. यावेळी देवळाली मतदारसंघात पक्षाची स्थिती खिळखिळी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले.
वरवर स्थिती चांगली असली तरी, प्रत्यक्षात संघटना कमकुवत आहे. त्यामुळे देवळाली मतदारसंघात जिल्हा परिषदेची एकही जागा निवडून येण्याची शक्यता कमी असल्याचे सांगत, पदाधिकाऱ्यांनी नेत्यांवरच शरसंधान साधले. या मतदारसंघातील विद्यमान आमदाराच्या विरोधात कार्यकत्यांना बळ दिले जात नसल्याचीही खंतही मांडली.
इगतपुरतही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसल्याचेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच आगामी निवडणुकांमध्ये आमदार, संपर्कप्रमुख यांना गट, गणनिहाय दौरे करून संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, नागरिकांचे प्रश्न सोडवावे लागतील, तरच पक्षाला विजय मिळविता येणे असल्याचे सांगितले.
मंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांचे टोचले कान
आयारामांना उमेदवारी देणाऱ्यांना नोटिसा बजवा, या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींवर मंत्री गुलाबराव पाटील आणि उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले. मंत्री पाटील म्हणाले, आयारामांना तिकीट देऊ नका, असे म्हणणे योग्य नाही. समोर आपला शत्रू मजबूत आहे, निवडून येण्यासाठी ते गल्ला आणि डल्ला आहे का पाहतात.
त्यामुळे सगळ्या जागा लढण्याची ताकद ठेवा, त्याला हरविण्यासाठी संपर्क मजबूत करा, असा सल्ला देतानाच तुम्ही जसे पक्षाकडून अपेक्षा ठेवता, तशाच अपेक्षा पक्षालाही तुमच्याकडून आहेत अशा शब्दात कान टोचले. तर, मनभेद, मतभेद आणि गटबाजी बाजूला ठेवा आणि आयाराम नको असतील तर तुम्ही स्ट्रॉग व्हा, असा कानमंत्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला. तसेच यापुढे संघटनेसाठी जो योगदान देईल, त्याला पदे मिळतील, असेही उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
महिला आघाडीतील गटबाजी चव्हाट्यावर
देवळाली आणि इगतपुरी मतदारसंघातील महिला आघाडीतील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे बैठकीत दिसून आले. देवळालीतील एका महिला पदाधिकाऱ्याने तर संघटनेतील काही महिला पदाधिकारी या बैठकीच्या नावाखाली तेल आणि किराणाचे डब्बे मागवून पार्टी करत असल्याचा गौप्यस्फोट केला. तर अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी महिला आघाडीतील गटबाजीवर बोट ठेवले. मात्र, खा. श्रीकांत शिंदे यांनी गटबाजी नसल्याचे सांगताना किरकोळ मतभेद असल्याचे म्हटले.
खा. श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याने शिवसैनिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्साह आणि एकजूट स्पष्टपणे दिसून आली. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असून, नाशिक जिल्ह्यात भगवा फडकवण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. जनतेच्या विकासासाठीची जबाबदारी आहे. शिवसेना प्रामाणिकपणे काम करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल.
- आ. सुहास कांदे, लोकसभा संपर्कप्रमुख