

कोल्हापूर : उन पावसाचा लपंडाव खेळणारा, इंदधनुष्याची कमान बांधणारा, हिरवाईचा गालिचा अंथरणारा, सणउत्सव अन् व्रतवैकल्याने सात्विकतेचा सडा शिंपडणारा, निसर्गाची समृद्धी उधळणारा श्रावण महिना शुक्रवारपासून सुरु होत आहे. 23 ऑगस्टपर्यंत श्रावणाचा बहर सुरु राहणार आहे. सण उत्सव, व्रतवैकल्याची मांदियाळी घेउन येणार्या या हिरव्या ऋतूच्या स्वागतासाठी प्रत्येकजण आतूर झाला आहे. हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला या भावनेला श्रावणाच्या उंबरठ्यावर मनोमनी पालवी फुटली आहे.
आषाढ महिना संपत आला की घरोघरी श्रावण महिन्यातील सणउत्सवाची तयारी सुरु होते. गेल्या आठवड्यापासूनच श्रावणमासाचे वेध लागले होते. धार्मिक विधी, सण यांची रेलचेल असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रावण सोमवारच्या व्रतानिमित्त जिल्ह्यातील महादेव मंदिरांची स्वच्छता व सजावट करण्यात आली आहे. पुढचा एक महिन्यात नागपंचमी, राखीपौर्णिमा, गोकुळ अष्टमी हे महत्वाचे सण साजरे होणार आहेत. यानिमित्ताने पूजा व धार्मिक साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गुरुवारी गर्दी झाली होती.
दक्षिण काशी आणि साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईचे स्थान असल्याने श्रावण महिन्यात धार्मिक पर्यटनाला बहर येणार आहे. या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर देवस्थान समितीच्यावतीने पर्यटक भाविकांसाठी नियोजन करण्यात आले आहे. शहर व जिल्ह्यातील प्राचीन महादेव मंदिरांमध्येही धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे.
आषाढ महिन्याची सांगता दीप अमावास्येने केली जाते. यानिमित्ताने गुरुवारी घरोघरी तसेच मंदिरांमध्ये दीपपूजन करून प्रज्वलित करण्यात आल्यामुळे श्रावण महिन्याच्या आरंभाची पूर्वसंध्या उजळून गेली. घरातील मुलांचे गृहिणींनी औक्षण केले. कणकेचे दिवे तयार करून अंगणात, उंबर्यावर लावून दीप अमावास्या साजरी करण्यात आली.