

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिर्डी येथील चार एकर भूखंड बळकावल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी कल्पना खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली. शनिवारी (दि. ११) कल्पना खरातच्या वकिलामार्फत न्यायालयात अर्ज सादर करून सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती.
त्यानुसार राहाता (जि. अहिल्यानगर) येथील न्यायालयाने सुनावणीची पुढील तारीख ठेवली आहे. या प्रकरणात कल्पना खरातसह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. अटकेत असलेल्या आरोपींना दोन वेळा पोलिस कोठडीही मिळालेली असून, तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे.
शिर्डी परिसरातील चार एकर भूखंड बळकावल्याचा आरोप या सर्वांवर आहे. दरम्यान, भोंदू अशोक खरातचे राज्यभरात उघडकीस येत असलेले विविध गैरप्रकार लक्षात घेता, या प्रकरणालाही वेगळे महत्त्व आले आहे.
कल्पना खरात ही या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असून, काही प्रकरणांमध्ये ती पतीला सहकार्य करीत होती का, याबाबतही तपास सुरू आहे. विशेषतः मालमत्तेशी संबंधित व्यवहारांमध्ये काही संशयास्पद बाबी आढळल्याने शिर्डी भूखंड बळकावल्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सुनावणी राहाता न्यायालयात सुरू असून, पुढील तारखेला जामीन अर्जावर निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, तपास यंत्रणांकडून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.