

नाशिक : मराठा आरक्षणाबाबत राज्यातील महायुती सरकारमध्येच एकवाक्यता नाही. एकीकडे मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर रद्द करण्याची मागणी सरकारमधील अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ करतात, तर दुसरीकडे जीआर रद्द करण्याची गरज नाही, असे जलसंपदामंत्री आणि मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील सांगतात. त्यामुळे सरकारनेच आता मराठा आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करत संभ्रम दूर करावा, असे नमूद करत भुजबळांना जर सरकारची भूमिका पटत नसेल, तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकदिवसीय राज्यस्तरीय शिबिर रविवारी (दि.14) नाशिकमध्ये होत आहे. या शिबिराच्या पूर्वसंध्येला मुंबई नाका येथील पक्षाच्या कार्यालयात आ. शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महायुती सरकार तसेच मंत्री भुजबळांवर तोफ डागली.
ते म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारमधील घटक पक्षांमध्ये श्रेयवाद रंगला आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आगळीक केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाला बाजूला सारत आरक्षणाचा जीआर जारी करत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. आता सरकारमधील मंत्रीच या आरक्षणाबाबत विरोधी भूमिका घेत आहेत.
मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण हवे असेल, तर एसईबीसी अंतर्गत 10 टक्के वेगळे आरक्षण रद्द करायचे का असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. त्यामुळे सरकार मराठा समाजाला कोणते आरक्षण देणार याविषयी संभ्रम असून, न्यायालयानेही याबाबत विचारणा केली आहे. सरकारने भूमिका स्पष्ट केल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिले की, फसवणूक झाली, हे स्पष्ट होईल, असे नमूद करत हैदराबाद गॅझेटच्या आधारे दिलेले आरक्षण कुणबी नोंदी असलेल्यांनाच मिळणार आहे.
यावर जर मनोज जरांगे पाटील समाधानी असतील, तर त्यांनीही तसा खुलासा करायला हवा, असेही आ. शिंदे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते रवींद्र पगार, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, शहराध्यक्ष गजानन शेलार आदी उपस्थित होते.
उबाठा-मनसे युतीबाबत ‘वेट अॅण्ड वॉच’
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा)- मनसे युती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे. यावर आ. शिंदे यांना विचारले असता, उबाठा- मनसे युतीचा निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. निर्णय जाहीर झाल्यानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे ते म्हणाले. एकनाथ खडसे हे पक्षाबरोबर असल्याचा दावा केला. त्याचबरोबर भारत- पाक सामन्याला मंजुरी देण्याच्या भाजपच्या भूमिकेचा निषेध आ. शिंदे यांनी केला.