

इंदिरानगर : दगडाने ठेचून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत उघडकीस आली. संतोष ऊर्फ छोटू काळे (38, रा. इंदिरा गांधी वसाहत, लेखानगर) असे खून झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष काळे गुरुवारी (दि.11) सायंकाळी 7 च्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. मात्र तो उशिरापर्यंत घरी परतला नाही. तो रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने चिंताग्रस्त झालेल्या त्याच्या वडिलांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला असता गरवारे बस स्टॉप परिसरात संतोष काळे रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळला. मात्र त्यावेळी तो मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपआयुक्त किशोर काळे, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीत, दोन अज्ञातांनी दगडाने ठेचून संतोषचा खून केल्याचे निष्पन्न झाले. पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला.
अनैतिक संबंधाच्या संशयातून घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत संतोष ऊर्फ छोटू काळे यांच्या पत्नीचे संशयित प्रफुल्ल कांबळे यांच्याशी अनैतिक संबंध असल्याने तसेच काळे दारू पिऊन त्याच्या पत्नीला त्रास देत होता. याच्यातूनच संतोष काळे याच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मृत काळे याची पत्नी पार्वती काळे व प्रफुल्ल कांबळे याला ताब्यात घेतले आहे. इतर दोन संशयित फरार असून, त्याचा पोलिस शोध घेत आहेत.