

नाशिक : शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांच्या तपासाला आता व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांपर्यंत असल्याने तपासासाठी विशेष तपास पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून संशयितांची चौकशी, कागदपत्रांची पडताळणी तसेच आर्थिक व्यवहारांची माहिती संकलित केली जाणार आहे.
पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, पोलीस निरीक्षक अशोक विठ्ठलम, सहायक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे किरण शेवाळे, यांच्यासह अन्य अधिकारी तपासासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेऊन जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांसाठी स्वतंत्र पथके कार्यरत करण्यात आली आहेत. जळगाव जिल्ह्यातील तपासासाठी पंचवटी, भडगाव, आडगाव, गंगापूर, सरस्वतीनगर आदी पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यासाठी अंबड व साक्री पोलीस ठाण्यांतील अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. धुळे व नंदुरबारच्या संयुक्त तपासासाठी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी नेमण्यात आले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील तपासासाठी उपनगर, इंदिरानगर, एमआयडीसी तसेच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक पथकाला संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास करून आवश्यक कागदपत्रे व पुरावे संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या कारवाईमुळे शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला वेग येण्याची शक्यता असून, या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि संबंधितांची भूमिका तपासण्यावर पोलिसांचा भर राहणार आहे.