

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका, जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) व मनसे युतीच्या प्रक्रियेने जोर धरला असून, नाशिकमध्ये उबाठा व मनसेच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी (दि. ८) मनोमिलन बैठक होत आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गट-गट रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर झाला असून १८ ऑगस्ट रोजी अंतिम आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणांनुसार राखीव जागा ठेवण्यात येणार आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात आला असून, शासनामार्फत तो निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर पुढील महिन्यात प्रारूप प्रभागरचना जाहीर केली जाईल, तर ऑक्टोबरमध्ये अंतिम प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्तारूढ भाजपने महापालिका निवडणुकीसाठी १०० प्लसचा नारा दिला आहे.
या निवडणुका महायुती म्हणून लढविणार की स्वबळावर हे अद्याप कस्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी अजित पवार गटानेदेखील निवडणुकांची जोरदार तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) व मनसे युतीच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.
किंबहुना मराठी भाषेच्या मुद्यावरून उद्धव व राज ठाकरे एकत्र आल्यानंतर युतीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. शालिमार येथील पक्ष कार्यालयात दुपारी १२.३० वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन उबाठाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते - यांनी केले आहे.