

नाशिक : राज्यात हिंदी सक्तीविरोधात शिवसेना (ठाकरे गट) व मनसेने दंड थोपटले असून मुंबईत ५ जुलै रोजी एकत्रित मोर्चा आयोजित केल्यानंतर नाशिकमध्ये देखील ठाकरे गट व मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मुंबईत एकत्रित शक्तिप्रदर्शनापूर्वी नाशिकमध्ये ४ जुलै रोजी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मराठी भाषेचा जागर व हिंदी सक्तीविरोधात निषेध केला जाणार आहे.
कधीकाळी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेचा गड राहिलेल्या नाशिकमध्ये या दोन्ही पक्षांची स्थिती दयनीय बनली आहे. ठाकरे गटातील अनेक बडे नेते व माजी नगरसेवक भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात गेले आहेत. आगामी काळातही काही मोठे प्रवेश भाजप-शिंदे गटात होणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला दररोज हादरे बसत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची स्थिती देखील फारशी आश्वासक नाही. दिनकर पाटील यांनी मनसेत प्रवेश केल्यानंतर पक्षात हालचाल दिसून येत आहे. मनसेमध्ये पुन्हा पक्षप्रवेश सोहळे सुरू झाले आहेत. आता ठाकरे गट आणि मनसेत युती होण्याच्या चर्चेने जोर धरला असताना नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यापूर्वी मनसेच्या नवचंडी यागाला देखील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावत युतीसाठी स्थानिक पातळीवर सकारात्मक भूमिका दर्शविली होती. आता हिंदीच्या मुद्यावरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा एकत्र येणार आहेत. हिंदी सक्तीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षातर्फे ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. नाशिकमधूनही या मोर्चासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जाणार आहेत. नाशिक ही कुसुमाग्रजांची भूमी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे मोर्चापूर्वी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी जाऊन मराठीचे पूजन करण्याची संकल्पना मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी मांडली असून पुढील दोन दिवसात उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याची अंतिम रूपरेषा ठरवली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
मराठी भाषेचा जागर तसेच हिंदी सक्तीच्या निषेधासाठी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जातील. रविववारच्या बैठकीत त्यासंदर्भात नियोजन केले जाईल.
दिनकर पाटील, प्रदेश सरचिटणीस, मनसे.
मुंबईत पाच जुलै रोजी होणाऱ्या संयुक्त मोर्चाच्या नियोजनासाठी नाशिकमधून ठाकरे गट व मनसे या दोन्ही पक्षांचे हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यासाठी रविवारी (दि. २९) दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.