

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनुकूल असतानाच त्यांच्या भूमिकेला पक्षातील माजी नगरसेवकांनीही पाठिंबा दर्शवला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मुंबई व राज्यातील वातावरण युतीसाठी अनुकूल आहे. युती केल्यास त्याचा पक्षाला फायदा होईल, असे सांगत सर्व माजी नगरसेकांनी एकमुखाने मनसेसोबतच्या युतीसाठी होकार दिला आहे. त्यामुळे उद्या, होणार्या शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहोळ्यात उद्धव ठाकरे याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे गटाकडून शिवसेनेचा 59 वा वर्धापनदिन गुरुवारी षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी 5 वाजता साजरा होणार आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा हा तिसरा वर्धापनदिन आहे. वर्धापनदिनासाठी शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार असून यावेळी मुंबईसह राज्यभरातून पक्षाची सर्व नेतेमंडळी, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, विभागप्रमुख, माजी नगरसेवक, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेतील बंडाळीनंतर आतापर्यंत 40 हून अधिक माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. या बंडाळीनंतर प्रथमच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे मुंबई पालिकेवरील आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी ठाकरे गटाने हालचाली सुरु केल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात महापालिका निवडणुकीची असलेली शक्यता लक्षात घेऊन आणि पक्षाच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी माजी नगरसेवकांची मातोश्री निवासस्थानी बैठक बोलावली होती.
या बैठकीला मुंबईतील 55 च्या आसपास माजी नगरसेवक उपस्थित होते, अशी सूत्रांनी माहिती दिली. या बैठकीत पक्षाच्या घडामोडीचा आढावा घेताना उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युती करायची की नाही, याबाबत विचारणा केली. ठाकरेंसोबत असलेल्या माजी नगरसेवकांनी युती करण्यास अनुकूल वातावरण असल्याचे मत व्यक्त करत एकमुखाने मनसेसोबतच्या युतीसाठी पाठिंबा दिला.
उद्धव ठाकरेंनी मुुंबई महानगरपालिकेसाठी मनसे किंवा महाविकास आघाडीतील पक्षांसोबत युती करण्याबाबत सर्व माजी नगरसेवकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही देत पक्षासोबत कायम असलेल्या माजी नगरसेवकांचे आभार मानले. तसेच येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत निवडणूक लागू शकते. तेव्हा शिवसेना भवन येथे बसून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवा. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर भगवा फडकवायचाच आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.