

नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना बियाण्यांच्या दरवाढीचा फटका बसत आहे. अधिक उत्पादन क्षमता, तुलनेत नफा व इतर पिकांच्या तुलनेत जनावरांसाठी मिळणारा अधिक चाऱ्यामुळे मका लावड क्षेत्र वाढत आहे.
मका बियाणे उत्पादक कंपन्यांनी चार किलोच्या बॅग मागे ३५० ते ४०० रुपयांनी दरवाढ केली आहे. याशिवाय कपाशी, मुग, बाजारी बियाण्यात देखील वाढ झाली झाली आहे. काही वर्षांपासून सतत ही दरवाढ होत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च वाढणार आहे.
गत काही वर्षांपासून पिवळं सोनं समजल्या जाणाऱ्या मका पिकाला जिल्ह्यातील शेतकरी मोठी पसंती देत आहे. अन्नप्रक्रिया, स्टार्च उद्योग, कुकुटखाद्य यासह चाऱ्याची उपलब्धता होत असल्याने गेल्या पाच वर्षांत मका लागवड क्षेत्र सातत्याने वाढले आहे. नाशिक विभागात जवळपास सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रावर मका लागवड होते. त्यामध्ये नाशिकमध्ये सर्वाधिक दोन लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मान्सूनचे आगमन झाल्याने सध्या शेतकऱ्यांकडून मका लागवडीची लगबग सुरू आहे. लागवड सुरू होत असतानाच बाजारात बियाणांच्या दरवाढीनंतर काही विक्रेते कृत्रिम टंचाई करत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. यासह २०० ते २५० रुपये अधिक दर घेऊन बियाणे उपलब्ध करून देत असल्याचेही शेतकरी सांगत आहेत.
तसेच मुग, कपाशी व बाजरी बियाण्यातही 50 ते 100 रुपयांपर्यंतची दर वाढ झाली आहे. यंदा अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे खरीप हंगामात लागवड करून नुकसान भरपाई करण्याची शेतकऱ्यांनी तयारी केली होती. परंतु, बियाण्यांचे दर वाढल्याने आता उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसल्याने मक्याला प्राधान्य देत आहोत. जिरायती भागातील शेतकऱ्यांचे मका हे हक्काचे पीक झाले आहे. तुलनेत मागणीमुळे दरही चांगले असल्याने शेतकरी लागवड करतात. शेतकऱ्यांच्या या मानसिकतेचा काही कंपन्या फायदा घेऊन दरवाढ केली आहे. या दरवाढीने उत्पादन खर्च वाढणार आहे.
प्रशांत कवडे, शेतकरी, नांदगाव, नाशिक.