

नाशिक : एकेकाळी सायन्सनंतर सर्वाधिक पसंतीची आणि प्रशासकीय सेवांसह विविध क्षेत्रांत भक्कम पाया घालणारी कला शाखा आज विद्यार्थ्यांच्या पसंतीच्या शर्यतीत मागे पडताना दिसत आहे. व्यवसाय, बँकिंग, लेखाशास्त्र आणि उद्योजकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या वाणिज्य शालाही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या ताज्या आकडेवारीत विज्ञान शाखेने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून, राज्यातील निश्चित झालेल्या एकूण प्रवेशांपैकी तब्बल ४५ टक्के प्रवेश विज्ञान शाखेत झाले आहेत. बदलत्या करिअरच्या संधी, तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढती मागणी आणि अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच संशोधन क्षेत्रातील रोजगाराच्या शक्यतांमुळे विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणावर विज्ञान शाखेकडे वळल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत विज्ञान शाखेत प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर कला शाखेची निवड करीत होते. प्रशासन, पत्रकारिता, कायदा, अध्यापन, साहित्य, समाजकार्य आणि स्पर्धा परीक्षांसाठी कला शाखा हा भक्कम पाया मानला जात होता.
मात्र बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत करिअरविषयीची विद्यार्थ्यांची मानसिकता झपाट्याने बदलली आहे. त्याचा थेट परिणाम कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांच्या प्रवेशसंख्येवर होताना दिसत आहे. राज्यात तिसऱ्या विशेष फेरीअखेर १२ लाख ६२ हजार ७४८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, अजूनही १० लाख ६६ हजार ५३२ जागा रिक्त आहेत.
विज्ञान शाखेत ३ लाख ४८ हजार ९५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. कला शाखेत १ लाख ६९ हजार ७८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून, विज्ञाननंतर दुसऱ्या क्रमांकाची पसंती या शाखेला मिळाली आहे. मात्र, राज्यभर कला शाखेसाठी सुमारे साडेसात लाखांहून अधिक जागा उपलब्ध असल्याने मोठ्या जागा रिक्त असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, वाणिज्य शाखेत केवळ १ लाख ३९ हजार ११३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने या शाखेकडे विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई विभागात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळते. येथे वाणिज्य शाखेला सर्वाधिक पसंती मिळाली असून, ५६ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
विज्ञान शाखेत ५० हजार ६५० विद्यार्थी दाखल झाले आहेत. मात्र पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, लातूर आणि छत्रपती संभाजीनगरसह बहुतांश विभागांमध्ये विज्ञान शाखेने आघाडी कायम ठेवली आहे. शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, जैवतंत्रज्ञान, आरोग्य सेवा आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या संधींमुळे विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. त्याचवेळी कला व वाणिज्य शाखांमधील करिअरच्या संधींबाबत प्रभावी जनजागृती न झाल्याने या शाखांबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, यूपीएससी, एमपीएससी, न्यायालयीन सेवा, पत्रकारिता, सामाजिक संशोधन, अर्थशास्त्र, बँकिंग, सीए, सीएस, उद्योजकता आणि व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रांत कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मात्र, शालेय स्तरावर योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि विज्ञान शाखेबाबत निर्माण झालेली प्रतिष्ठेची मानसिकता यामुळे या दोन्ही शाखांवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कमी होत असल्याचे चित्र अकरावीच्या यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत पुन्हा अधोरेखित झाले आहे.
मुंबई : ३१,८३९
पुणे : १८,१२३
छत्रपती संभाजीनगर : १४,१५७
नाशिक : १२,३००
नागपूर : १०,७१४
अमरावती : ९,९५७
कोल्हापूर : ९,३६६
लातूर : ६,४२४
एकूण प्रवेश क्षमता : २२,२९,५१८
नोंदणी केलेले विद्यार्थी : १५,१८,९७०
निश्चित झालेले प्रवेश : १२,६२,७४८
रिक्त जागा : १०,६६,५३२
विज्ञान शाखा : ३,४८,९५१ (४५ टक्के)
कला शाखा : १,६९,७८५
वाणिज्य शाखा : १,३९,११३