नाशिक : झाडं ही आमची आईबाप आहेत. त्यांच्यावर कोणी हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही, असा गर्भित इशारा देत तपोवनातील वृक्षतोडीला अभिनेते तथा सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी कडाडून विरोध दर्शवला. मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांची जनभावना समजून घेतली पाहिजे. साधुग्रामचे कारण देऊन तपोवनात एक्झिबिशन सेंटर उभारण्यासाठी काढण्यात आलेले टेंडर चुकीचे आहेत. त्यामुळे तपोवनातील झाडे वाचवण्यासाठी नाशिकमध्ये जे आंदोलनाचा लढा उभा राहिलाय त्याला माझा पाठिंबा आहे, अशी भूमिकाही शिंदे यांनी मांडली.
सिंहस्थासाठी साधुग्राम उभारणीच्या नावावर तपोवनात केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीचे प्रकरण आता चांगलेच चिघळले आहे. साधुग्रामसाठी १८२५ झाडे तोडण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेविरोधात शहरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी एकवटले आहेत. या आंदोलनाला राजकीय पक्षांबरोबरच सेलिब्रेटींनी देखील पाठिंबा दिला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी शनिवारी (दि.२९) तपोवनातील वृक्षांची पाहणी करत थेट आंदोलनात सहभाग घेतला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी तपोवनातील झाडे तोडता कामा नये, अशी भूमिका घेतली. वृक्षतोडीविरोधात अत्यंत परखडपणे भाष्य करताना शिंदे म्हणाले की, साधू आले, गेले तरी त्याने काही फरक पडत नाही. याविषयी माझा अभ्यास नाही. पण झाडे गेली तर नाशिककरांचे नुकसान होईल. इथले एकही झाड तुटता कामा नये. ही सगळी झाडे वाचली पाहिजेत, असे शिंदे यांनी सांगितले. आपल्याच माणसांनी आपल्याला फसवले तर त्यांना आपले कसे म्हणायचे. शासन आपले आहे की इंग्रजांचे राज्य आहे. आपल्याला झाडांची वयाची व्याख्याच माहिती नाही, तशी व्याख्या करणे महाराष्ट्र सरकारला जमलेले नाही. आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे. हा वृक्ष सर्वात जास्त भारत सरकारनेच तोडलाय. ही मोठी झाडे जास्त ऑक्सिजन देणारी असतात. त्यांची मोठी पाने जास्त कार्बन घेतात, ऑक्सिजन देतात. वडाच्या झाडावर ५०० ते ६०० प्रजाती जगतात. अशी झाडे तोडली तर त्याला माफी नाही. झाडे ही आपले आईबाप आहेत. आमच्या आईबापांवर हल्ला केला तर आम्ही मुलं काही इतकी बुळगी नाही. आमच्या आईबापांवर हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा यावेळी शिंदे यांनी दिला.
गिरीश महाजनांना आव्हान
झाडे वाचवण्यासाठी एकजूट झालेल्या नाशिककरांचे कौतुक करतानाच सयाजी शिंदे यांनी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट निशाणा साधला. शिंदे म्हणाले की, तपोवनात एक्झिबिशन सेंटर उभारले जाणार आहे. त्यादृष्टीने पुढील ३० ते ३५ वर्षांसाठी टेंडर्स काढण्यात आली आहेत. गिरीश महाजनांनी यावर उत्तर दिले पाहिजे. ते जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांच्याशी आपली वैयक्तिक दुश्मनी नाही. दुश्मनी झाली तरी त्याने मला फरक पडत नाही, असे थेट आव्हानच शिंदे यांनी दिले.