

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी सातपूर पोलिसांनी राबविलेल्या 'ऑल आउट कॉम्बिंग ऑपरेशन' दरम्यान मोठी कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत १०३ टवाळखोरांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
तसेच अवैध देशी दारूविक्री करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शनिवारी (दि. २०) सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत सातपूर ठाण्याच्या हद्दीत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करून ही मोहीम राबविण्यात आली.
कारवाईदरम्यान सातपूर गाव, प्रबुद्धनगर, अशोकनगर आणि श्रमिकनगर परिसरातील सार्वजनिक ठिकाणी विनाकारण थांबून दहशत निर्माण करणारे तसेच उघड्यावर मद्यपान करणारे १०३ जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. याशिवाय प्रबुद्धनगर आणि श्रमिकनगर भागात अवैधरीत्या देशी दारूची विक्री करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात स्वतंत्र कारवाई करण्यात आली.
मोहिमेदरम्यान १३ समन्सची बजावणी करण्यात आली, तर बेलवॉरंटमधील दोन आरोर्पीनाही ताब्यात घेण्यात आले. या व्यापक मोहिमेत परिमंडळ-२ अंतर्गत अंबड, इंदिरानगर, एमआयडीसी, देवळाली कॅम्प, उपनगर, नाशिकरोड आणि सातपूर पोलिस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकातील ५ अधिकारी व ३३ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.