

सातपूर : पढारी वृत्तसेवा
पाणी तापवण्यासाठी प्लास्टिकच्या बादलीत ठेवलेले कॉइल हीटर बंद करण्यास विसर पडल्याने बादली पेटून लागलेल्या आगीत फ्लॅट बेचिराख झाल्याची धक्कादायक घटना सातपूरच्या अशोकनगरातील बोलकर व्हॅली या निवासी इमारतीत घडली. एका मानवी चुकीमुळे संसाराची राखरांगोळी झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीतील रहिवासी भास्कर महाजन यांच्या फ्लॅटमध्ये सकाळी स्नानासाठी प्लास्टिकच्या बादलीत पाणी तापवण्यासाठी हीटर कॉइल ठेवून ते ऑन करण्यात आले होते. मात्र, पाणी तापल्याचे लक्षात न राहिल्याने बादलीतील पाणी पूर्णपणे आटले. यामुळे गरम झालेल्या हीटरने पेट घेतला आणि प्लास्टिकची बादली पेटून आगीचा भडका उडाला. काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण घराला कवेत घेतले.
घराच्या खिडक्यांमधून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचे पाहून इमारतीमधील रहिवाशांनी बाहेर धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेविका इंदूबाई नागरे यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल होईपर्यंत परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी प्रयत्न केले.
माजी नगरसेवक विश्वास नागरे, समाधान देवरे, नगरसेविका माधुरी बोलकर आदींनी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारतीचा वीजपुरवठा खंडित केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग इतर फ्लॅट्समध्ये पसरण्यापासून रोखली. मात्र महाजन यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे विजय मुसळे, अशोक मोरे, प्रसाद भडके, स्वप्निल गांगुर्डे, गौरव जाधव, उमेश गावित आणि आयुष सोलंकी यांनी आग विझवली.
नागरिकांनो, हे टाळा !
ही घटना सर्वसामान्यांचे डोळे उघडणारी आहे. इलेक्ट्रिक हीटरचा वापर करताना तो कधीही सोडून दुसरीकडे जाऊ नका. तुमचा एक छोटासा विसर आयुष्यभराची कमाई क्षणात जाळून खाक करू शकतो. विद्युत उपकरणांचा वापर करताना नागरिकांनी अत्यंत सतर्क राहणे गरजेचे आहे