

नाशिक : शहरातील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या ‘सावाना’च्या कलामहर्षी वा. गो. कुलकर्णी कलादालनाच्या जागी लवकरच लघुनाट्यगृह (ब्लॅक बॉक्स थिएटर) उभारले जाणार आहे.
मुंबई, ठाणे आणि पुण्यानंतर नाशिकमध्ये प्रथमच लघु आकाराचे नाट्यगृह साकारले जाणार आहे. ही सुविधा प्रायोगिक रंगभूमीसाठी उपयुक्त ठरणार असून, नाट्यप्रयोग व तालमींसाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. या निर्णयामुळे नाट्यकर्मींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सावानाच्या परशुराम साइखेडकर नाट्यगृहाजवळील चित्रमहर्षी वा. गो. कुलकर्णी कलादालन अनेक दिवसांपासून रिकामे असून, ते 'ब्लॅक बॉक्स' लघुनाट्यगृहासाठी वापरावे, अशी रंगकर्मींची जुनी मागणी आहे. प्राजक्त देशमुख यांनी अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्याकडे मार्च २०२५ मध्ये यासंदर्भात प्रस्ताव मांडला होता. यामुळे नाटकांच्या तालमी, एकांकिका, दीर्घांक प्रयोगासाठी छोटेखानी जागा उपलब्ध होऊन नाशिकमधील प्रायोगिक रंगभूमीला चालना मिळेल, असे रंगकर्मींचे मत आहे.
त्यानुसार, सावानाने 'ब्लॅक बॉक्स' नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी देणगीदारांनी दिलेल्या ६० लाख रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे. येत्या डिसेंबरपर्यंत या 'ब्लॅक बॉक्स'चे काम पूर्ण करून ते रंगकर्मींच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मनोदय आहे.
वा. गो. कुलकर्णी कलादालनाची संपूर्ण जागा ब्लॅक बॉक्स म्हणून विकसित करणार आहे. कलादालन ग्रंथालयाच्या देवघेव विभागात स्थलांतरित केले जाईल. यासंदर्भात लवकरच कार्यवाही पूर्ण होणार असून, डिसेंबरअखेर काम पूर्ण करण्याचा मानस आहे.
प्रा. दिलीप फडके, अध्यक्ष, सावाना.
दि. ११ मार्च रोजी दै. 'पुढारी'ने 'शहरात लघुनाट्यगृहांची गरज' या मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या वृत्ताद्वारे छोट्या रंगमंचाची आवश्यकता अधोरेखित केली होती. प्रायोगिक रंगभूमीला चालना मिळावी यासाठी लघुनाट्यगृह व ब्लॅकबॉक्स थिएटरची आवश्यकता असल्याचे त्या वृत्तात नमूद केले होते. अखेर या विषयाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, दै. 'पुढारी'च्या पाठपुराव्याला यश आले आहे.
सावानात लघुनाट्यगृह व्हावे, ही स्थानिक रंगकर्मींची इच्छा होती. ती सावाना कार्यकारिणीने मान्य केल्याचा अत्यानंद आहे. यामुळे शहरात पहिल्यांदा रंगकर्मींसाठी असे छोटे नाट्यगृह उपलब्ध होणार असून, यामुळे प्रायोगिक नाट्य चळवळ अधिक गतिमान होणार आहे.
प्राजक्त देशमुख, रंगकर्मी, नाशिक.
मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने ग्रंथपाल कै. संध्या देशमुख मुळे यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श ग्रंथालय पुरस्कार यंदा सार्वजनिक वाचनालय, नाशिकला जाहीर झाला आहे.
वाचनालयाच्या वतीने होणार्या वाङ्मयीन पुरस्कार, जिल्हा साहित्यिक मेळावा, साहित्य सावाना दिवाळी अंक, ग्रंथपाल पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार पुरस्कार, पुस्तक परीक्षण, बालसाहित्यिक मेळावा, इत्यादी चौफेर कार्याची नोंद घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात करण्यात आला. मराठवाडा साहित्य परिषदचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी पुरस्काराची घोषणा केली. 5 ऑगस्ट 2025 रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. 7,500 रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने सावानाचे सर्व पदाधिकारी, सेवकवृंद तसेच वाचक आणि नाशिक साहित्यिक यांचे अभिनंदन करण्यात आले.