

सप्तशृंगगड :श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे नूतन ग्रामपंचायत प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन तालुक्याचे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते पार पडले. मात्र या कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामस्थांनी गडावरील अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांवर रोखठोक भूमिका घेत थेट चर्चा केली. यामध्ये रोप वेचा गावाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला गंभीर परिणाम, बसस्थानकाचा प्रश्न, ट्रस्टकडून गावाकडे होत असलेले दुर्लक्ष, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व स्थानिक रोजगाराचे मुद्दे ठळकपणे मांडण्यात आले. रोप वे सुरू झाल्यानंतर गावात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत सुमारे 75 टक्क्यांनी घट झाली असून याचा थेट परिणाम छोटे दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांच्या उपजीविकेवर झाला असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
यावेळी ग्रामस्थांनी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टवर आरोप करत, ट्रस्ट केवळ मंदिर, पायरी वरच्या भागातील सुविधांपुरते मर्यादित आहे. गावातील स्वच्छता, पाणी, रस्ते, रोजगार व मूलभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते, असा ठपका ठेवला. तसेच ट्रस्टच्या निधीचा व भाविकांच्या दानाचा गावविकासासाठी वापर होत नसल्याची नाराजीही उघडपणे व्यक्त करण्यात आली. या आरोपांवर ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी व सहायक व्यवस्थापक भगवान नेरकर यांनी स्पष्टीकरण देत, ट्रस्टकडून विविध विकासकामे सुरू असून, ग्रामपंचायतीशी समन्वय साधून पुढील काळात गावासाठी अधिक कामे केली जातील, असे स्पष्ट केले.
आ. नितीन पवार यांनी ग्रामस्थांचे प्रश्न ऐकून घेत बसस्थानक, स्वच्छता, पाणीपुरवठा, तलाव विकास व रस्त्यांबाबत जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तसेच ग्रामपंचायत, ट्रस्ट, रोप वे प्रशासन व ग्रामस्थांनी एकत्र येऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
स्वच्छतेबाबत आमदारांचा ठणकावणारा आदेश
यावेळी आ. नितीन पवार यांनी गडावरील अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत ग्रामपंचायतीला थेट आदेश दिला. सप्तशृंगगड हे आंतरराज्य धार्मिक स्थळ आहे. येथे घाण, कचरा व दुर्गंधी खपवून घेतली जाणार नाही. येत्या 8 ते 10 दिवसांत संपूर्ण गाव स्वच्छ करून दाखवा, असे ठणकावून सांगत त्यांनी ग्रामपंचायतीला स्पष्ट सूचना दिल्या. तसेच शेगाव मॉडेलचा बोध घ्या, असे सांगत ट्रस्ट, रोप वे प्रकल्प व ग्रामपंचायत यांनी संयुक्तपणे नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण आणि जबाबदारीने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
बसस्थानकाचा प्रश्न ऐरणीवर
सप्तशृंगगडावरील बसस्थानक अद्याप योग्य ठिकाणी नसल्याने भाविकांची गैरसोय होत असून, त्याचा परिणाम गावातील व्यवसायावर होत आहे. बसस्थानक गावालगत नियोजनबद्ध ठिकाणी उभारावे, ज्यामुळे गावच्या विकासास मदत होईल. त्यात शिवालय तीर्थ परिसरातील मोकळ्या जागेचा विचार करावा. निर्णय घेताना गावातील व्यावसायिकांचा विचार व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी आ. नितीन पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.