Saptashringgad Navratra Saptami : सप्तमीला सप्तशृंगगडावर शुकशुकाट

पावसामुळे भाविकांनी जाणे टाळले, व्यापाऱ्यांना मोठा फटका
सप्तशृंगगड (नाशिक)
सप्तशृंगगड : येथे सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे भाविकांची नवरात्रीत असलेल्या गर्दीवर परिणाम पहायला मिळाला. सप्तमीला सप्तशृंगगडला महत्व असूनही सप्तमीच्या दिवशी गडावर असा शुकशुकाट होता. (छाया : रघुवीर जोशी)
Published on
Updated on

सप्तशृंगगड (नाशिक) : साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव परतीच्या पावसाने अक्षरशः पाण्यात वाहून गेला. शनिवार (दि.२७) सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर रविवार (दि. २८) कायम राहिला. धुके व मुसळधार सरींनी पुन्हा एकदा संपूर्ण गडाला कवेत घेतल्याने सोमवार (दि. २९) सप्तमी असूनही गडावरील गाभारा, सभामंडप, पायऱ्या आणि बाजारपेठेत शुकशुकाट होता. सप्तमीला नेहमी भाविकांची तोबा गर्दी उसळते. सप्तमीचा योग साधत हजारो भाविक आई भगवतीच्या चरणी दरवर्षी नतमस्तक होतात पण यंदा पावसामुळे ही परंपरा खंडित झाल्याचे बोलले जात आहे.

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट तर्फे पंचामृत महापूजा विश्वस्त डॉ. प्रशांत देवरे व देणगीदार भाविक भूपेश जैन यांनी सपत्नीक केली. महानैवेद्य आरती दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केली. यंदा सप्तमी असुनही भाविक गडावर न आल्याने प्रसाद, फुलं, पूजेचे साहित्य, हॉटेल्स, स्टॉलधारक साऱ्यांचीच उलाढाल कोसळली. एकूणच नवरात्रोत्सवाची रंगत परतीच्या पावसाने फिकी पाडली. नवरात्रोत्सवात देवीच्या दरबारात सन्नाटा अशी परिस्थिती शेकडो वर्षात प्रथमच निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

यंदाचा नवरात्रोत्सव आमच्या सर्व व्यापाऱ्यांसाठी अक्षरशः धक्कादायक ठरला आहे. परतीच्या पावसामुळे भाविकांची गर्दी पूर्णपणे नाहीशी झाली आहे आणि आमच्या उलाढालीवर मोठा परिणाम झाला. अनेक व्यापाऱ्यांचे स्टॉल भिजले, साहित्य खराब झाले. काहींना तर रोजचे खर्चही निघत नाहीत इतका तोटा बसला आहे.

अजय दुबे, अध्यक्ष, सप्तशृंगगड व्यापारी संघटना

सप्तशृंग गडावर येणाऱ्या भाविकांवर विसंबून असलेल्या लहानमोठ्या व्यावसायिकांसाठी नवरात्रोत्सव पर्वणी असतो. मात्र, यंदा सततच्या पावसाने आणि धुक्याने भाविकांचे पाय गडाकडे वळालेच नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

संदीप बेनके, व्यापारी तथा उपसरपंच, सप्तशृंगगड

सप्तशृंगगड (नाशिक)
Saptashring gad Nature Beauty सप्तशृंगगड परिसरात खुलले निसर्गसौंदर्य

भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. श्री सप्तशृंग देवी मंदिर २४ तास खुले आहे आणि घाटरस्ता पूर्णपणे सुरळीत आहे. हवामानामुळे गर्दी कमी झाली असली तरी दर्शनात कुठलीही अडचण नाही. पावसामुळे घाबरून परतीचा विचार न करता भाविकांनी निश्चिंतपणे गडावर यावे, सुरक्षिततेची सर्व व्यवस्था केली आहे.

राजेश गवळी, ग्रामपंचायत सदस्य, सप्तशृंगगड

श्री भगवतीच्या नवरात्र उत्सव दरवर्षी अतिशय उत्साहात व भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये साजरा होतो, मात्र यंदाच्या वर्षी उत्साहात नवरात्राची सुरुवात झाली मात्र अवकाळी पावसामुळे गडावर प्रथमच भाविकांची गर्दी कमी बघायला मिळाली. सप्तमीच्या दिवशी प्रथमच पावसामुळे विविध दुकाने बंद ठेवली होती. व्यापाऱ्यांचे नुकसान व भाविकांची कमी गर्दी हे दृश्य प्रथमच या नवरात्रोत्सवात बघायला मिळाले.

रमेश पवार, सरपंच, सप्तशृंगगड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news