

सप्तशृंगगड (नाशिक) : रघुवीर जोशी
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या श्री सप्तशृंग गडाचे सौंदर्य चांगलेच खुलले असून, चारही बाजूंनी कोसळणारे धबधबे आणि हिरवाईने परिसराचे रूप अधिकच खुलले आहे. त्यामुळे गडावर भाविकांसह पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
मागील 15 दिवसांपासून सप्तशृंग गडावर पाऊस सुरूच असून, सप्तशिखर आणि सभोवतालचा परिसर गर्द हिरवाईने नटला आहे. त्यातच दाट धुके आणि उंच कड्यांवरून कोसळणारे धबधबे असा निसर्ग पर्यटकांना माेहिनी घालत आहे. दरवर्षी पावसाळ्यात या परिसरात अशीच रमणीयता अनुभवायला मिळते. विशेषतः या काळात निसर्गप्रेमी, फोटोग्राफर, ट्रेकर आणि भाविक यांची गडावर वर्दळ असते. यंदाही भाविक, पर्यटक गडावर गर्दी करताना दिसत आहेत.
सप्तशृंग गडाच्या पायथ्यापासून ते शिखरापर्यंत पसरलेले निसर्गसाैंदर्य व ठिकठिकाणी कोसळणाऱ्या धबधब्याजवळ भाविक, पर्यटक फोटाे काढण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. मात्र, अनेक धबधब्यांजवळ कुठल्याही प्रकारची सुरक्षा नसल्यामुळे भाविकांनी काळजी घेण्याची गरज आहे.