

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थानास निघालेली संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी बुधवारी (दि.11) सातपूर येथे दाखल झाली. यावेळी स्वागत समितीने पालखीचे जल्लोषात स्वागत केले. बुधवारी पालखीचा पहिला मुक्काम सातपूर येथे झाला. गुरुवारी (दि.12) पालखी पुढील मार्गस्थासाठी प्रस्थान होणार असून, नाशिक पंचायत समिती आवारात पालखीचे स्वागत होणार आहे.
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीचे बुधवारी सायंकाळी सातपूर गावात आगमन झाले. यावेळी स्वागत समिती ग्रामस्थांनी टाळ-मृदंगाच्या पथकाने फुलांची उधळण करत जोरदार स्वागत केले. विठ्ठलाच्या जयघोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला होता. पालखीच्या स्वागतासाठी बँडपथक तैनात करण्यात आले होते. पपया नर्सरी ते सातपूर गाव अशी स्वागत यात्रा काढण्यात आली होती. यावेळी सातपूर ग्रामस्थांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले होते. आमदार सीमा हिरे यांसह समितीचे अध्यक्ष नीलेश भंदुरे, कार्याध्यक्ष सुनील मौले, नितीन निगळ, गोकुळ निगळ, विजय भंदुरे, शांताराम निगळ, अमर काळे, माजी नगरसेविका सीमा निगळ, तुकाराम बंदावने यांनी पालखीचे पुष्पहार अर्पण करत स्वागत केले.
पालखीचा पहिला मुक्काम सातपूर गावात होतो. त्यामुळे पालखीच्या स्वागताची तयारी एक महिना अगोदरपासूनच सुरू होती. पालखी स्वागत समिती ग्रामस्थांच्या मदतीने सर्व बारीकसारीक गोष्टींचे नियोजन केले होते. पालखीतील भाविक, वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आली. पालखीच्या स्वागतापासून निवासाची, स्नानाची व्यवस्था, चहा, नाश्ता, सुरुची भोजन, शौचालय व्यवस्था, पिण्याचे पाणी आदींसह सर्व प्रकारची व्यवस्था यावेळी करण्यात आली होती.