त्र्यंबकेश्वर (नाशिक) : टाळ - मृदंगाच्या गजरात विठूनामाचा गजर करीत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तिनाथांची पालखी आषाढवारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपुरकडे मंगळवारी (दि. १०) मार्गस्थ झाली. हजारो वारकरींची मांदियाळी, महिलांच्या डाईवर तुळशी वृंदावन, पुरुषांच्या खांद्यावर भगव्या पताका अन् मुखी संत तुकारामरचित ‘जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा’ या अभंगाच्या उच्चाराने अवघे वातावरण भारावून गेले होते. आगामी २७ दिवसांत सुमारे ४०० किलोमीटर अंतर कापून हा भक्तीसागर पांडुरंगाच्या चरणी दाखल होणार आहे.
पालखी दृष्टीक्षेपात
४८० किमी अंतर कापणार २७ दिवसांत
५५ दिंड्या यंदा पालखी सोहळ्यात सहभागी
शासनाकडून पालखीसोबत रुग्णवाहिका, पाणी टँकर, मुक्कामस्थळी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था.
परंपरेनुसार संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीने मंगळवारी (दि. २) दुपारी २ वाजता पंढरपुर मार्गावर प्रस्थान ठेवले. तत्पूर्वीच दिंड्या आणि वारकऱ्यांचा जत्था त्र्यंबकनगरीत दाखल झाला होता. तीन वाजेच्या दरम्यान तीर्थराज कुशावर्तावर पालखीचे आगमन झाले. याठिकाणी नाथांच्या पादुकांची महापूजा झाली. तेथून पालखी रथ त्र्यंबकराजासमोर दाखल आला. येथे वारकर्यांनी अभंग सेवा रुजू केली. पालखी प्रस्थानासाठी मानकरी, माजी नगराध्यक्ष सुनिल अडसरे, बाळासाहेब अडसरे, अजय अडसरे यांची बैलजोडी जोडण्यात आली होती. पुढील प्रवासासाठी प्रगतशी शेतकरी सचिन शिखरे, विसापूरचे निवृत्ती भुजाडे, मातोरी येथील मातुलेश्वर भजनी मंडळ यांच्या तीन बैलजोड्या असतील. चांदीच्या रथाला दरवर्षीप्रमाणे कैलास माळी आणि रवींद्र माळी यांनी स्वखर्चाने आकर्षक पुष्पांनी सजावट केली आहे. २७ वर्षांपासून ते सजावट करतात. पालखीपाठोपाठ मानाच्या दिंड्यांनी वारीला प्रारंभ केला. यामध्ये मोहन महाराज, हभप बेलापूरकर, बाळासाहेब देहूकर, डावरे महाराज, जयंत महाराज गोसावी यासह वारकरी सहभागी झाले आहेत.
प्रस्थानासाठी समाधी मंदिर संस्थान अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर, सचिव श्रीपाद कुलकर्णी, पालखी सोहळाप्रमुख नवनाथ गांगुर्डे, विश्वस्त कांचन जगताप, सचिव अमर ठोंबरे, नीलेश गाढवे, नारायण मुठाळ, माधव महाराज राठी, योगेश गोसावी, भानुदास गोसावी, राहुल साळुंके यासह विश्वस्त तसेच मानकरी उपस्थित होते. सर्व मानकरी दिंडी चालक यांचा नारळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. यावर्षी जवळपास ५० हजार वारकरी दिंडीत सहभागी झाले असून, त्यात महिला, त्यातही वृद्धांची लक्षणीय संख्या दिसून आली.
दरवर्षी आषाढीसाठी वारी मार्गस्थ होताना त्र्यंबकनगरीवर हमखास पर्जन्यधारा कोसळतात. यंदामात्र वरुणराजाची अनुपस्थिती वारकऱ्यांना जाणवली. त्यानंतरही उत्साह तसूभरही कमी झाला नाही. मंगलवाद्य आणि हरीनामाचा गजर करत पालखी, मध्यभागी नगारा असलेली बैलगाडी अन् त्यापुढे पदन्यास करणारे अश्व असे दृष्य टिपण्यासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती.
नियोजनानुसार, पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकपासून दोन किमीवरील पेगलवाडी फाटा येथील महानिर्वाणी आखाड्यात पडला. सायंकाळच्या सुमारास वारकरी येथे विसावले. शासनाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. बुधवारी पालखी सातपूरमध्ये दाखल होईल.