

नाशिक : राजधानी दिल्ली येथील 'भारत मंडपम्' येथे 'सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन' प्रस्तूत आणि सनातन संस्था आयोजित सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीचे सांस्कृतिक कार्यमंत्री कपिल मिश्रा उपस्थित होते.
महोत्सवाच्या प्रारंभी रामनामाचा सामूहिक जप करण्यात आला. शंखनाद आणि वेदमंत्र पठणानंतर शांतिगिरी महाराज, सनातन संस्थेचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति अंजली गाडगीळ, सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशनचे अध्यक्ष उदय माहूरकर, पत्रकार सुरेश चव्हाणके, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. चारुदत्त पिंगळे, सनातन संस्थेचे अभय वर्तक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करत महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी मंत्री कपिल मिश्रा म्हणाले, पूर्वीच्या सरकारच्या काळात राष्ट्राच्या खऱ्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सरकारचा विरोध असायचा, त्यावर चर्चा कुठे करायची, असा प्रश्न होता.
आज सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवास केंद्र आणि राज्य सरकार अशा दोघांचेही समर्थन आहे. यावेळी वंदे मातरम् या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सर्व उपस्थितांनी वंदे मातरम्चे सामूहिक गायन केले. उद्घाटनप्रसंगी हजारो वर्षापूर्वींच्या श्री सोरटी सोमनाथच्या ज्योतीर्लिंग दिव्यांशाचे दर्शन घडवण्यात आले. यावेळी संतांच्या हस्ते पूजन करत महात्म्य सांगण्यात आले. सनातन संस्था निर्मित 'संकल्प रामराज्य का' या हिंदी ग्रंथाचे, तर संरक्षण मंत्रालयाचे अपर सचिव वेदवीर आर्य लिखित 'क्रॉनोलॉजी ॲन्ड ओरिजिन्स ऑफ इन्डो युरोपियन सिव्हिलायजेशन' या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.