

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी नाशिक शहरात साधुग्राम, वाहनतळ, निवाराशेड या सुविधा उभारण्यासाठी ८०० एकर जागा भाडेतत्त्वावर अधिग्रहीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या जमिनीचे सर्वेक्षण व आनुषंगिक कामांसाठी सल्लागार सर्वेक्षकांची नेमणूक करण्यासही प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्याची माहिती कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.
कुंभमेळा विकास प्राधिकरणाची बैठक सायंकाळी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता घेऊन तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करत कामांना गती देण्याचे निर्देश डॉ. गेडाम यांनी दिले. बैठकीस प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक बी. डी. पाटील, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भाडेतत्त्वावर अधिकृत करावयाच्या जमिनीसाठी सल्लागार सर्वेक्षकांची नेमणूक, नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अत्यावश्यक कामांसाठी प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धता, शहर व ग्रामीण पोलिस विभागाच्या प्रस्तावित कामांच्या आराखड्यास अंतिम मान्यता, जुन्या जिल्हा परिषद इमारतीतील कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयाचे नूतनीकरण व फर्निचर पुरवठा या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी बैठकीतील विषयांची आवश्यकता स्पष्ट केली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या कामांची माहिती सादर केली.
गुणवत्ता तपासणीसाठी तज्ज्ञांची नेमणूक
बैठकीत गोदावरी नदी काठावरील ग्रीन बेल्ट क्षेत्रात नवीन घाट निर्मितीसाठी भूसंपादन, विविध विकासकामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी विशेष तज्ज्ञांची नेमणूक, लक्ष्मीनारायण घाटाची लांबी वाढवणे तसेच चांदशी ते जलालपूर येथील मलनिस्सारण व्यवस्थेच्या कामांचा आढावा घेण्यात आला.