

सातपूर : पुढारी वृत्तसेवा
औषध व्यवसाय, फार्मासिस्ट, घाऊक व किरकोळ औषध विक्रेते तसेच रुग्णांच्या हिताशी संबंधित विविध प्रश्नांवर समर्थ क्रांती फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी औषध वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि रुग्ण सुरक्षेसंदर्भातील मुद्द्यावर चर्चा झाली.
फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी औषध वितरण व्यवस्थेतील अनियमितता, अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांकडून औषधांचा वापर, काही डॉक्टरांकडून विशिष्ट मेडिकल स्टोअर्सना लाभदायक ठरणाऱ्या प्रिस्क्रिप्शन पद्धती, एक्स्पायरी औषधांच्या परताव्यात येणाऱ्या अडचणी, घाऊक व किरकोळ औषध विक्रेत्यांसाठीच्या नियमांतील विसंगती,
ऑनलाइन औषधविक्रीतील त्रुटी तसेच अवाचनीय प्रिस्क्रिप्शनमुळे निर्माण होणारे धोके यांसह अनेक प्रश्न मांडले. या सर्व मुद्द्यांवर आयुक्त मुंढे यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रतिनिधींचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घेतले.
यावेळी फाउंडेशनचे संस्थापक धनंजय खाडगीर, सुनीता माळोदे, विजय गायखे, सचिव शिवाजी कडभाने, उमेश येवले, अश्विनी खकाळे आणि वैशाली सोनवणे उपस्थित होते.
पुरावे, कागदपत्रांसह वस्तुनिष्ठ माहिती आवश्यक
औषध व्यवसायातील गैरप्रकारांविरोधातील प्रभावी कारवाईसाठी संबंधित पुरावे, कागदपत्रे आणि वस्तुनिष्ठ माहिती प्रशासनाला उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.