

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने सीए इंटरमीडिएट सप्टेंबर २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत नाशिकची साक्षी चांदक व मुंबईचा नील राजेश शाह यांनी ५०२ गुणांसह संयुक्तपणे देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नाशिक शहरातून वरुण योगेश ब्रह्मे दुसरा (३८३ गुण), रोहित गणेश वारुडे तिसरा (३७६ गुण), स्वराज दिनेश जातेगावकर चौथा (३७० गुण) आणि अझीझुर अब्दुलरहमान शेख पाचवा (३६५ गुण) मिळवत यश संपादन केले.
विशेष म्हणजे हे पाचही विद्यार्थी दोन्ही ग्रुप एकाच प्रयत्नात पास झाले आहेत.
देशपातळीवर श्रुती व्ही (चेन्नई-४९२) दुसरा (८२ टक्के), प्रेम अग्रवाल (सुरत - ४९० गुण) तिसरा क्रमांक (८१.६७ टक्के) असे यश मिळवले आहे. देशात दोन्ही ग्रुपचा निकाल १३.२१ टक्के लागला असून, एकूण १४,८१८ विद्यार्थी सीए इंटरमीडिएट उत्तीर्ण झाले आहेत.
या परीक्षेचा संपूर्ण निकाल 'आयसीएआय'च्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
दरम्यान, निकालानंतर आयसीएआय नाशिक शाखेचे उपाध्यक्ष सीए मनोज तांबे, सचिव सीए विशाल वाणी, कोषाध्यक्ष सीए दिलीप बोरसे तसेच वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट स्टुडंट असोसिएशन अर्थात विकासा कमिटीचे चेअरमन सीए रोहन कुलकर्णी, सहसदस्य सीए शुभम मुंदडा, सीए पीयुष चांदक, उपाध्यक्ष वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल आणि कार्यकारिणी सदस्य तसेच माजी अध्यक्ष सीए जितेन्द्र फाफट यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
आयसीएआय नाशिक शाखेचे अध्यक्ष सीए अभिजित मोदी यांनी सांगितले की, हा निकाल नाशिकच्या शैक्षणिक वाटचालीत महत्त्वाचा टप्पा आहे. साक्षीच्या रूपाने मिळवलेले यश इतरांना प्रोत्साहन देणारे आहे. विशेष म्हणजे सीए फाउंडेशन परीक्षेत साक्षी जैनने देशात यश मिळवले, तर यंदा इंटरमीडिएट परीक्षेत साक्षी चांदकने यश मिळवले आहे. हा योगायोगच म्हणावा लागेल.
दोन्ही ग्रुपला एकूण विद्यार्थी : ३०२
त्यापैकी दोन्ही ग्रुप पास झालेले : २७
ग्रुप १ : बसलेले ४६९ - उत्तीर्ण : ९९
ग्रुप २ : बसलेले २३६ - उत्तीर्ण : ४७
ग्रुप - १ : परीक्षा दिलेल्या १,००,३०१ उमेदवारांपैकी २३,२१० उमेदवार उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी २३.१४ टक्के इतकी आहे.
ग्रुप - २ : परीक्षा दिलेल्या ६८,४०० उमेदवारांपैकी १२,९३८ उमेदवार उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी १८.९२ इतकी आहे.
दोन्ही ग्रुप : ३८,३३९ उमेदवारांनी दोन्ही ग्रुपची परीक्षा दिली होती, त्यापैकी ५,०६६ उमेदवार उत्तीर्ण झाले असून, ही टक्केवारी १३.२१ इतकी आहे.
या परीक्षेच्या माध्यमातून एकूण १४,८१८ उमेदवार सीए इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.