

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने सेवा प्रत्येक आखाड्यांसाठी सुविधांच्या विकासकामाला पाच कोटी रुपयांचा भरीव निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या आखाड्यांच्या समन्वय बैठकीत केली. याबाबत त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती यांनी सरकाराचे आभार मानले आहे.
सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाला प्रारंभ झाला तेव्हापासून असलेली आखाड्यांच्या साधुंची मागणी शासनाने मान्य केली आहे. याबाबत साधू-महंतांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रत्येक आखाड्याला पाच कोटी रुपयांची विकासकामे आणि आश्रम, मठ, कुटीया यांना विकासकामांचा स्वतंत्र निधी मिळावा, अशी मागणी महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी केली होती.
कुंभमेळा नियोजनासाठी भेट देणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचा आग्रहदेखील धरला होता. १३ एप्रिलला मुंबईतील सह्याद्री अथितीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या समवेत त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथील १३ आखाड्यांच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात आली.
या बैठकीस कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले उपस्थित होते. बैठकीत प्रत्येक आखाड्याला पाच कोटी रुपये आणि छोट्या संस्थांना प्रत्येकी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. आखाड्याचे वीजबिल प्राधिकरणाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. शासकीय कामांसाठी आखाड्याची जमीन अधिग्रहीत केल्यास त्यांना मोबदला अथवा जमीन देण्याची घोषणा झाली. याबाबत साधू-महंतांनी समाधान व्यक्त केले आहे.
आखाड्यांच्या जमिनीबाबत घेतलेला निर्णय शेतकऱ्यांनादेखील लागू करावा, अशी मागणी होत आहे. शेतजमिनीला शासन २५ हजार रुपये गुंठा भाव देत आहे. लगत असलेल्या प्लॉटला २५ लाख रुपये मोजावे लागत आहेत. शासनाने शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन दिल्यास योग्य न्याय होईल, अशी मागणी बाधीत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शासनाने आमच्या मागणीप्रमाणे प्रत्येक आखाड्याला पाच कोटी रुपये व छोट्या संस्थांना १५ लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कुंभमेळामंत्री यासह मंत्रिमंडळाचे आणि अधिकाऱ्यांचे आभारी आहोत. विकास कामांसाठी वेळ कमी आहे. यापुढे कामांना गती देण्यासाठी निधी वर्ग करणे यासह सर्व शासकीय सोपस्कार वेगाने पूर्ण करावेत.
- महंत शंकरानंद सररवती महाराज, अध्यक्ष, श्री पंचायती तपोनिधी आनंद