

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
नवीन कारच्या कायमस्वरूपी पासिंगसाठी चक्क एका दिव्यांग वकिलाकडे आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावाने लाच मागणाऱ्या एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इच्छादेवी चौकातील बजाज टीव्हीएस शोरूमजवळ सापळा रचून अटक केली. योगेश रामभाऊ पाटील (३९, रा. आदर्शनगर, जुन्या आरटीओ शेजारी, जळगाव) असे या लाचखोर एजंटचे नाव असून, त्याला सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
तक्रारदार खाजगी वकील असून, दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत. त्यांनी १ जुलै रोजी खानदेश मोटार शोरूमधून मारुती (अल्टो के-१०) कार खरेदी केली होती. येथील खाजगी एजंट योगेश पाटील याच्यामार्फत ३ ऑगस्ट रोजी गाडीचे तात्पुरते रजिस्ट्रेशन करण्यात आले. दिव्यांग असल्याने तक्रारदारांनी कारमध्ये हँडकिट बसवून घेतले आणि १२ ऑगस्ट रोजी कायमस्वरूपी पासिंगच्या चौकशीसाठी ते आरटीओ कार्यालयात गेले.
एजंट पाटील याने तक्रारदाराला गाठत आरटीओतील साहेब पासिंग करून देण्याच्या बदल्यात १० हजार रुपये मागत असल्याचे सांगितले. तडजोडीअंती आठ हजार ५०० रुपये ठरले. याबाबत वकिलाने थेट एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने १७ ऑगस्ट रोजी सापळा रचून पाटील यास अटक केली. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक सुरेश पाटील, सुनील वानखेडे, राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.