Nashik Simhastha Kumbh Mela 2027 | साधुग्राममध्ये दहा लाख साधू-भाविकांसाठी जलव्यवस्था

Nashik Sadhugram water supply project- १५५ कोटींच्या खर्चातून जलवाहिन्या व वितरण यंत्रणेची उभारणी
Simhastha Kumbh Mela Nashik
Simhastha Kumbh Mela NashikPudhari News Network
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरात उभारण्यात येणाऱ्या साधुग्राममध्ये दहा लाख साधू-महंत आणि भाविकांच्या पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. यासाठी सुमारे १५५ कोटी रुपये खर्चुन जलवाहिन्या आणि पाणी वितरण यंत्रणेचे जाळे उभारण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली असून, साधुग्राममध्ये पायाभूत सुविधांच्या उभारणीला वेग आला आहे.

नाशिक महापालिका आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडून तपोवनातील प्रस्तावित साधुग्रामच्या नियोजनाला प्राधान्य दिले जात आहे. प्रयागराज महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदा नाशिकमध्ये साधू-महंत, आखाडे आणि खालशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा तब्बल १ हजार ३८० एकर क्षेत्रावर साधुग्राम उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

स्वामिनारायण मंदिरापासून नांदूर गावाच्या शिवेपर्यंत साधुग्रामचा विस्तार करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यापूर्वी २००३ मध्ये १०५ एकर, तर २०१५ मध्ये ३२३ एकर क्षेत्रावर साधुग्राम उभारण्यात आले होते. मात्र, यंदा आठ ते दहा कोटी भाविकांच्या संभाव्य गर्दीचा विचार करून साधुग्रामचा विस्तार करण्यात येत आहे. दोन हजारांहून अधिक खालसे दाखल होण्याची शक्यता गृहित धरून नियोजन केले जात आहे.

प्रस्तावित साधुग्राममध्ये निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर या तीन प्रमुख आखाड्यांसाठी स्वतंत्र सेक्टर उभारण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे १०३ एकर क्षेत्र राखीव ठेवण्याचे नियोजन आहे. प्रत्येक आखाड्याला स्वतंत्र भूखंडासह खालशांसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. साधू-संतांसाठी भोजनालय, पिण्याचे पाणी, आरोग्य केंद्र, पार्किंग, स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही यंत्रणा आणि चोवीस तास सुरक्षाव्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या सर्व व्यवस्थांमध्ये पाणीपुरवठा हा महत्त्वाचा घटक ठरणार आहे. साधुग्राममध्ये दहा लाख साधू-महंत आणि भाविकांची संभाव्य उपस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने स्वतंत्र जलवाहिन्या व वितरण यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मलनिस्सारणासाठी स्वतंत्र यंत्रणा पाणीपुरवठ्याबरोबरच साधुग्राममध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र मलनिस्सारण यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक निविदा प्रक्रियेद्वारे या कामाचा ठेका दिला जाणार असून, साधुग्रामच्या प्रस्तावित क्षेत्रात मलवाहिन्यांचे जाळे विकसित केले जाणार आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने दाखल होणाऱ्या साधू-महंत आणि भाविकांच्या पाणीपुरवठ्यासह स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Simhastha Kumbh Mela 2027 |नाशिक कुंभमेळ्यासाठी १० हजार डॉक्टरांची फौज देणार

150 दशलक्ष लिटर दररोज पाणीपुरवठा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त ६३५ दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण करण्याची मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली आहे. या पाण्यातून साधुग्रामला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. विस्तारित मुकणे धरणातून थेट जलवाहिनीद्वारे साधुग्राम परिसरात पाणी आणले जाणार असून, या जलवाहिनीचे कामही प्रगतिपथावर आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Simhastha Kumbh Mela 2027| सिंहस्थात विद्यार्थ्यांना सेवेची पर्वणी, पर्यावरण संवर्धनासाठी शैक्षणिक संस्थांचा पुढाकार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.