

Residential areas are flooded due to lack of sewage management
सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामागील बाजूस असलेल्या मातंग वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे रहिवाशांची अडचण होत आहे. त्यामुळे नगर परिषदेने पावसासह सांडपाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
मागील ७० वर्षांपासून या भागात लोक वस्ती करून राहात असल्याचे सांगितले जाते. मात्र आजवर नगर परिषदेने सांडपाण्याची व्यवस्था केलेली नाही. नागरिकांना ये जा करण्यासाठी रस्ता नाही. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे येथे कृत्रिम तलाव तयार होतो. येथे जवळपास ३० घरांची वस्ती आहे. मात्र नगर परिषद लक्ष आणि सुविधा पुरवत नसल्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाच्या पाण्याचा डोह साचल्यानंतर लहान मुलांसह रहिवाशांना पाण्यातून मार्गक्रमण करत जावे लागते. नगरपालिका किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही, अशी तक्रार आहे. या भागात एखादी आगीसारखी दुर्घटना घडल्यास अग्निशमन बंब येऊ शकणार नाही, असेही रहिवाशांचे म्हणणे आहे. नगर परिषदेने सुविधा न पुरविल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.
पावसाळ्यात या भागात पाण्याचा डोह तयार होतो. राहत्या घरांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान होते. मात्र प्रशासनाला याचे काहीएक देणेघेणे नाही. वस्तीत स्वच्छता होत नाही. रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचादेखील प्रश्न निर्माण होत आहे.
शासकीय जागेवर अतिक्रमण करून घरे बांधण्यात आलेली आहेत. हा भाग खोल असल्याने मोठ्या पावसानंतर वस्तीत पाणी शिरते. नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आम्ही साफसफाईचे काम करून देत असतो. नगर परिषदेने ड्रेनेज लाइन टाकलेल्या आहेत.
- रवींद्र देशमुख, आरोग्य निरीक्षक, नगर परिषद, सिन्नर
पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागतो. पाणी घरांमध्ये शिरते. पाऊस थांबल्यानंतर पाण्याचा कसाबसा निचरा होतो. मात्र, चिखलातून वाट काढत ये-जा करावी लागते. सध्या नगर परिषदेत प्रशासक आहे. यापूर्वी नगरसेवकांना सांगितले तर ते आमदारांकडे बोट दाखवतात. त्यामुळे काय करावे, हेच कळत नाही.
-प्रसाद दोडके, रहिवासी