

नाशिक : एकल महिलांच्या पुनर्विवाहासाठी जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या 'नवचेतना' उपक्रमांतर्गत तब्बल ८ हजार पुरुषांनी अर्ज दाखल केले असून पुनर्विवाहाची इच्छा व्यक्त केल्याने जिल्हा परिषद प्रशासनाला आश्चर्याचा धक्का बसला. यामुळे रविवारी (दि.१४) एकाच दिवशी ८ ते १० हजार व्यक्तिंचे नियोजन करणे अशक्य असल्यामुळे हा मेळावा तात्पुरता स्थगित केला आहे. तर, यापुढील मेळावा हा ऑनलाईन घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी घेतला आहे.
जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील सर्व एकल महिलांचे सर्वेक्षण केले असता जिल्हाभरात तब्ब्ल ९४ हजार ९८५ एकल महिला आढळल्या आहेत. या एकल महिलांमध्ये विधवा महिलांचे प्रमाण सर्वात जास्त असून त्यांची संख्या ८९ हजार ३७४ आहे त्याचबरोबर जिल्ह्यात २ हजार ९५८ परित्यक्ता १ हजार ९९५ घटस्फोटीत महिला व अविवाहित प्रौढ महिलांची संख्या ही ६५८ आहे. प्राप्त झालेल्या एकल महिलांपैकी अवघ्या १०० महिलांनी पुनर्विवाहासाठी अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे महिलांमध्ये जनजागृती होण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत पुन्हा विशेष प्रयत्न केले जाणार आहे. या आकडेवारीतून समाजातील विवाह विषयक भीषण वास्तव उघडकीस आले आहे.
सर्वेक्षणाचा महिलांना होणार फायदा
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून १३ हजार ५३४ महिलांच्या मुला-मुलींना प्रतिमहिना २२५० रुपये मदत मिळणार आहे. अनाथ, निराश्रित आणि आपद्ग्रस्त मुलांच्या संगोपनासाठी ही आर्थिक मदत दिले जाते. या योजनेत, एकल पालक असलेल्या मुलांना किंवा इतर आपद्ग्रस्त बालकांना १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत दरमहा ही मदत मिळते.
प्रवर्ग निहाय एकल महिला
विधवा महिला- ८९३७४
परितक्त्या- २९५८
घटस्फोटीत-१९९५
कुमारिका-६५८
एकुण-९४९८५
एकल महिलांचे वर्गीकरण
नोकरी करणाऱ्या - ९७६४
महिला बचत गट व ५५ च्या आतील - १२५६५
१८ पेक्षा कमी वयाची मुले असणाऱ्या महिला - ७३६३
१८ पेक्षा कमी वयाची मुलली असणाऱ्या महिला - ६१७१
एकुण - १३ हजार ४३४
तालुकानिहाय एकल महिला
निफाड (८७५७)
नाशिक (५१०८)
बागलाण (५१०४)
दिंडोरी(३२२७)
चांदवड (७५६१)
कळवण(५७५५)
सिन्नर (९५७४)
पेठ (३७४१)
इगतपुरी (९१९१)
त्र्यंबकेश्वर (२९७८)
मालेगाव( ६५२८)
नांदगाव (६९०२)
येवला (८८४८)
देवळा (५६१८)
सुरगाणा (६०९३)