

राज्य सरकारतर्फे 337 कोटी 41 लाख 53 हजार रुपयांचा निधी मंजूर
डीबीटी पोर्टलव्दारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार
मनमाड (नाशिक) राज्यातील नुकसानग्रस्त सुमारे एक लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळाला
मनमाड (नाशिक) : रईस शेख
फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांच्या कालावधीत अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे पिकांचे नुकसान होऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारतर्फे 337 कोटी 41 लाख 53 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हा निधी डीबीटी पोर्टलव्दारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. शेतकऱ्यांना दिलेली मदत निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य कोणत्याही वसुलीत वर्ग करू नये असा स्पष्ट आदेश राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून सहसचिव संपत सूर्यवंशी यांनी काढलेल्या परिपत्रकात दिला आहे. त्यामुळे मनमाड राज्यातील नुकसानग्रस्त सुमारे एक लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्यावर्षीपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळ्याचे वेळापत्रकच कोलमडले असून चक्क उन्हाळ्यात पाऊस पडायला लागला तर हिवाळ्यात थंडी ऐवजी कडक उन्हाळा जाणवत आहे. या बदलामुळे नैसर्गिक आपत्तीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे.
यावर्षी फेब्रुवारी ते मे या चार महिन्याच्या कालावधीत राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणत अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. मे महिन्यात तर पावसाळ्यासारख्या पाऊस झाला. त्याचा फटका कांदा, मका, भाजीपाल्यासह इतर पिकांना बसला. दरम्यान, राज्य शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 337 कोटी 41 लाख 53 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्या खरीपाचा हंगाम सुरु असल्यामुळे बी-बियाणे, रासायनिक खते यासह इतर साहित्य आणि वस्तू घेण्यासाठी शेतकऱ्यांना हाताभार लागणार आहे.
अवकाळीत सर्वात जास्त नुकसान कांदा पिकाचे झाले होते. विभागात 45 हजार 935 हेक्टरवरील पिके उध्वस्त होऊन 1 लाख 5 हजार 147 शेतकरी बाधित झाले होते. राज्यात 1 लाख 87 हजार 53 हेक्टरवरील पिके नष्ट होऊन 3 लाख 98 हजार 603 शेतकऱ्यांना फटका बसला होता. अचानक अवकाळी पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे हाता- तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे बळीराजावर आर्थिक संकट आले होते.