

दक्षिण भारत, महाराष्ट्र, मध्यप्रदेशातील कांदा तसेच नाफेड आणि एनसीसीएफचा बफर स्टॉक या सर्वांची एकत्रित बाजारातील आवकेत वाढ
बाजारभावात मोठ्या प्रमाणावर घसरण होण्याची भीती
कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याच्या उंबरठ्यावर
Lasalgaon Onion Farmers Latest News
लासलगाव (नाशिक) : कांद्याला अपेक्षित दर न मिळाल्याने आधीच अस्वस्थ असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आता आणखी भर पडली आहे. कारण दक्षिण भारत, महाराष्ट्र, मध्यप्रदेशातील कांदा तसेच नाफेड आणि एनसीसीएफचा बफर स्टॉक या सर्वांची एकत्रित बाजारातील आवकेत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारभावात मोठ्या प्रमाणावर घसरण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. लासलगाव बाजार समितीत सध्या उन्हाळ कांद्याला किमान ५००, कमाल १९०१ तर सरासरी १३७५ रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
विशेष म्हणजे, येत्या काळात दक्षिण भारतासह महाराष्ट्र, मध्यप्रदेशातील कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात येण्याची शक्यता आहे. यासोबतच एनसीसीएफ व नाफेडकडून सुमारे तीन लाख टन बफर स्टॉकमधील कांदा विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे सर्व कांदे एकाच वेळी बाजारात आल्यास, भावात आणखी मोठी घसरण होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, दक्षिणेकडील कांद्याची आवक सुरू झाली असून पुढील काही दिवसांत हा कांदा बाजारपेठेवर पूर्णपणे अधिराज्य गाजवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील कांद्याची मागणी कमी होण्याची आणि त्यामुळे बाजारभाव आणखी कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल १३०० ते १४०० रुपये दर मिळत असून या दरात पुन्हा घट झाली, तर अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता आहे. भाववाढीच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. मात्र, एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कांद्याची बाजारात आवक झाली तर शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले जाण्याची भीती आहे. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने कांद्यावर दिली जाणारी प्रोत्साहन रक्कम वाढवावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.