

नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून 2025-26 या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एक लाख 33 हजार कामे सुरू असून, त्यातून 251 कोटींची कामे झाली आहेत. गत वर्षाच्या तुलनेत ही वाढ 81 टक्के आहे. या वर्षाच्या 31 मार्चपर्यंत या रोजगार हमीची रक्कम 300 कोटींच्या पार जाण्याची शक्यता आहे.
रोजगार हमी योजनेतून व्यक्तिगत लाभाची तसेच सार्वजनिक स्वरूपाची कामे केली जातात. त्यात प्रामुख्याने वनविभाग, कृषी विभाग हे सार्वजनिक स्वरूपाची कामे करतात, तर ग्रामपंचायत विभाग व्यक्तिगत लाभाच्या योजनांना प्राधान्य देते. रोजगार हमी विभागाने राज्यस्तरावरून मातोश्री पाणंद रस्ते कामांना मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय मान्यता दिल्याने जिल्ह्यात कुशल व अकुशल कामांच्या खर्चाचे 60:40 प्रमाण बिघडले होते. मात्र, पाणंद रस्त्यांची कामे रोजगार हमीमधून करण्यास परवानगी देणे बंद झाल्याने मागील दोन वर्षांत कुशल व अकुशल कामांचे प्रमाण राखण्यात यश मिळाले.
मागील काही वर्षांत केंद्र व राज्य सरकारने घरकूल योजनांमधून मोठ्या प्रमाणावर उद्दिष्ट देण्यात आले आहेत. घरकूल योजनेत शौचालयांची कामे रोजगार हमी योजनेतून केली जातात. तसेच घरकूल कामात लाभार्थींना रोजगार हमी योजनेतून मजुरी दिली जाते. यामुळे 2023-24 व 2024-25 या वर्षांत रोजगार हमी योजनेचा खर्च अनुक्रमे 126 व 170 कोटी झाला होता. यावर्षी रोजगार हमीच्या खर्चात विक्रमी वाढ होऊन जानेवारी 2026 च्या पहिल्या आठवड्यात तो 251 कोटी रुपये झाला आहे. यात अकुशल मजूर खर्चाचे प्रमाण 83 टक्के आहे. म्हणजे सरकारने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा 23 टक्के अधिक आहे.
40 हजार कामे पूर्ण
जिल्ह्यात घरकूल योजनेची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून, त्यात लाभार्थ्यांना घरकूल कामाची मजुरी व रोजगार हमीतून दिली जाते. तसेच शौचालयांची कामे रोजगार हमीतून केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रोजगार हमीची 40 हजार 333 कामे पूर्ण झाली असून, त्यातील बहुतांश कामे घरकुलांची आहेत. त्याचप्रमाणे 88 हजार कामे सुरू आहेत. याकामांची संख्या बघता मार्चअखेर जिल्ह्यात रोजगार हमीचा खर्च 300 कोटींच्या पार सहज जाऊ शकतात.