

सिन्नर (नाशिक ) : महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सोमवारी (दि. 15) सिन्नर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे राष्ट्रीय कांदा भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. देशातील हे पहिलेच राष्ट्रीय कांदा भवन असेल, असा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले की, आजपर्यंत कांदा शेती ही बिनभरवशाची व कर्जावर चालणारी शेती होती. परंतु राष्ट्रीय कांदा भवन उभे राहिल्यानंतर कांदा शेती ही भरवशाची, शाश्वत नफ्याची आणि सुरक्षित शेती बनेल. राष्ट्रीय कांदा भवन हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे सुरुवातीला दोन एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून, भविष्यात गरजेनुसार अधिक क्षेत्रात त्याचा विस्तार केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी अंदाजे 5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ही रक्कम शेतकर्यांच्या देणगीतून उभारली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यातील व देशातील सर्व बाजार समित्यांध्ये कांदा विक्रीचे व्यवहार पूर्णपणे पारदर्शक, कोणत्याही शेतकर्याची आर्थिक फसवणूक, पिळवणूक किंवा लूट होणार नाही. निर्णयप्रक्रियेत शेतकरी सर्वोच्च स्थानी या तत्त्वांवर राबविण्यासाठी राष्ट्रीय कांदा भवन येथून नियंत्रण ठेवले जाणार आहे. राज्य किंवा केंद्र सरकारकडून शेतकर्यांच्या हिताविरोधात धोरणे झाली, तर राष्ट्रीय कांदा भवन गप्प बसणार नाही, संवादासोबत गरज पडल्यास संघर्षही केला जाईल, असे दिघोळे यांनी सांगितले. सध्या अस्तित्वात असलेली लांब व दलालयुक्त साखळी कमी करून, शेतकरी राष्ट्रीय कांदा भवनद्वारे देशी व परदेशी ग्राहक अशी थेट कांदा विक्री व्यवस्था उभारण्यात येणार आहे. यामुळे शेतकर्यांना शाश्वत नफा, तर ग्राहकांना माफक व स्थिर दरात कांदा मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भारत हा जगातील प्रमुख कांदा उत्पादक देश असतानाही आजपर्यंत कांदा आयात- निर्यात, निर्यातबंदी, नाफेड व एनसीसीएफचा बफर स्टॉक व दरनियंत्रणाचे निर्णय शेतकर्यांना विश्वासात न घेता घेतले जात होते. राष्ट्रीय कांदा भवन उभारल्यानंतर हे सर्व निर्णय शेतकर्यांच्या नेतृत्वाखाली आणि शेतकर्यांच्या हितासाठी घेतले जाणार असल्याचे दिघोळे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी सिन्नर युवक तालुकाध्यक्ष अरुण चव्हाण, सोनाथ गिते, गणेश सांगळे, कैलास आव्हाड, संतोष दिघोळे, भाऊसाहेब केदार, सतीश दिघोळे, नितीन गिते आदींसह शेतकरी उपस्थित होते.
बियाणे संशोधन ते विक्रीपर्यंत संपूर्ण नियंत्रण
राष्ट्रीय कांदा भवन येथून कांदा बियाणे संशोधन व दर्जानियंत्रण रोपांचे संगोपन, लागवडीनंतर खते व औषधांचे शास्त्रीय नियोजन, उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी सामूहिक खरेदी, पिकाची संपूर्ण निगराणी हे सर्व काम कमी खर्चात व सामूहिक पद्धतीने केले जाणार असल्याचे सांगण्यात आल
राज्यातून, देशातून व परदेशातून येणार्या शेतकरी, व्यापारी, निर्यातदार, अधिकारी, धोरणकर्ते व कांदा क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी राष्ट्रीय कांदा भवन येथे राहण्याची व जेवणाची सुविधा, बैठक व परिषद कक्ष, इंटरनेट, संगणक, लॅपटॉप, कांदा टेस्टिंग लॅब यासह सर्व आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना