

Ajit Gopchade on Kinnar Bhavan Nanded
नांदेड : समाजातील तृतीयपंथीय हा एक दुर्लक्षित आणि वंचित घटक आहे. त्यांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी, त्यांना सन्मानाची व प्रतिष्ठेची वागणूक मिळावी यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. याच दृष्टीने नांदेड शहरालगतच्या म्हाळजा (कामठा) परिसरात साडेतीन एकर जागेवर 'किन्नर भवन' उभारण्यात येणार आहे, अशी माहिती राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांनी आज (दि.२१) दिली.
खासदार गोपछडे यांनी समाजकल्याण विभागाचे अधिकारी आणि प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांसह प्रस्तावित जागेची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, तृतीयपंथीयांचे जीवन अनेकदा हालअपेष्टांनी भरलेले असते. समाजातील मुख्य प्रवाहापासून ते दूर राहतात. त्यामुळे त्यांच्या जीवनात सन्मान, सुरक्षितता आणि स्थैर्य यावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने तृतीयपंथीयांसाठी गरीमागृह सारख्या अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. त्याच धर्तीवर नांदेडमध्ये उभारण्यात येणारे हे ‘किन्नर भवन’ एक अभिनव उपक्रम ठरणार आहे.
या किन्नर भवनात निवास व्यवस्था, स्मशानभूमी, वैद्यकीय व सामाजिक सुविधा, प्रशिक्षण आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हा प्रकल्प तृतीयपंथीय समाजाच्या पुनर्वसनासाठी आणि सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल.'
प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत किन्नर समुदायाला शुभ मानतात. मंगल प्रसंगी, विवाह, बारसे, शुभारंभ, प्रसंगी त्यांचे आगमन उपस्थिती शुभ मानली जाते, किन्नर कलेचे उपासक आहेत, त्यांना अर्धनारी नटेश्वर संबोधले जाते, त्यांच्या मध्ये शिवपार्वतीचा निवास असतो, असे मानले जाते.
युद्धाला जाण्यापूर्वी त्यांच्या कडून औक्षण केले जाणे ही विजयासाठी पूरक शुभ मानले जात असे. अशा शुभशकुनी समूहाच्या उन्नती साठी एका ध्येयवादी प्रेरणेतून नांदेड समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, तहसीलदार संजय वारकड, कमल फाउंडेशनचे सचिव अमरदीप गोधणे, तसेच किन्नर समाजातील मान्यवर रणजीता बकस गुरु, फरिदा बकस, अर्चना बकस, जया बकस, बिजली बकस इत्यादी उपस्थित होते. माझे स्पष्ट मत आहे की – समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. तृतीयपंथीयांसाठी उभारण्यात येणारे हे 'किन्नर भवन' केवळ एका इमारतीचा प्रकल्प नसून त्यांच्या आयुष्यात आशा, आत्मसन्मान आणि नवजीवनाचा एक आधारस्तंभ ठरणार आहे.