

शहागड : अंबड तालुक्यातील शहागड येथील बाजार तळातील रामनगर गल्लीतील वीज रोहित्रावर (डीपी) प्रचंड अतिरिक्त भार पडत असून, त्यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वारंवार फ्यूज जाणे व केबल जळण्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी या परिसरात दिवसभर वीजपुरवठा खंडित राहतो असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रामनगर गल्लीतील सदर रोहित्र हे 100 केव्ही क्षमतेचे असून प्रत्यक्षात त्यावर सुमारे 200 कुटुंबांचा भार आहे. या रोहित्रावरून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शहागड, दोन अंगणवाड्या, आठवडे बाजार, ठाकरे हायस्कूल तसेच रामनगर परिसरातील वीजपुरवठा केला जातो. वाढत्या भारामुळे केबल वारंवार जळून खाली पडत असल्याने या भागात लहान मुले, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच आठवडे बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
सध्या या रोहित्राला केवळ तीन फ्यूज असून, वाढत्या भाराच्या पार्श्वभूमीवर हे रोहित्र किमान 200 केव्ही क्षमतेचे व सहा फ्यूजचे करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. बाजार तळ परिसरातील तांबोळी गल्लीतील सुमारे 50 कुटुंबे व संपूर्ण रामनगरमधील अंदाजे 150 कुटुंबे या एकाच रोहित्रावर अवलंबून आहेत.
मंगळवारी सकाळी बाजार तळातील रामनगर डीपीवरील केबल तुटलेली आढळून आली. या ठिकाणी अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व आठवडे बाजार असल्याने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
आमदार हिकमत उढाण यांना यांची कल्पना दिली आहे. या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येईल. तत्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
राजेश राऊत, शिवसेना विभागप्रमुख, शहागड.