नाशिक : येथील अनंत कान्हेरे मैदानावर शनिवार (दि.१) पासून खेळविल्या जाणाऱ्या महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र या संघांदरम्यानच्या रणजी स्पर्धेतील साखळी सामन्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने नाशिकला २ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा 'येलो अलर्ट' दिल्याने, सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन्ही संघातील स्टार खेळाडू नाशिकला दाखल झाले असून, गुरुवारी (दि.३०) सौराष्ट्र संघाच्या खेळाडूंनी मैदानावर कसून सरावही केला.
२००५ पासून नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रणजी सामने खेळविले जातात. यापूर्वी वर्षाच्या प्रारंभी २३ ते २६ जानेवारी २०२५ मध्ये महाराष्ट्र विरुद्ध वडोदरा रणजी सामना खेळविण्यात आला होता. या सामन्यात महाराष्ट्र संघाने तब्बल ४३९ धावांनी विजय मिळविला होता. या सामन्याला नाशिकच्या क्रीडाप्रेमींनी उदंड प्रतिसाद दिला होता. कारण कान्हेरे मैदानावर आतापर्यंत झालेल्या रणजी सामन्यात नेहमीच महाराष्ट्र संघाने बाजी मारली आहे. २००५ पासूनन आतापर्यंत नाशिकला तब्बल ११ रणजी सामने खेळविण्यात आले आहेत. यामध्ये सहा सामन्यांचा निकाल लागला असून, पाच सामने अनिर्णीत राहिले आहेत. या सहापैकी चार विजय महाराष्ट्र संघाच्या नावावर असून, एकमेव विजय सौराष्ट्र संघाने नोंदविला आहे. त्यामुळे शनिवारपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र संघादरम्यानच्या सामन्यावर क्रीडाप्रेमींचे लक्ष असणार आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून नाशिकमध्ये अवकाळी पाऊस कोसळत असल्याने, रणजी सामन्यावर या पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे पाऊस आल्यास सामना अनिर्णीत ठेवला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, चार दिवसीय सामान्यासाठी मैदानावर जोरदार तयारी केली जात आहे. खेळपट्टीच्या देखभालीचे काम सातत्याने केले जात आहे. मैदानावर 'स्कोअर बोर्ड' लावण्यात आला आहे. सामन्यासाठी जय्यत तयारी केली जात असली तरी, पावसामुळे क्रीडाप्रेमींच्या आनंदावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र संघाचे पारडे जड
नाशिकमध्ये बापू नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली १९५७ मध्ये पहिला रणजी सामना खेळविण्यात आला होता. त्यानंतर २००५ पासून नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रणजी स्पर्धेतील ११ सामने खेळविण्यात आले. यात महाराष्ट्राने नऊपैकी चार सामन्यात विजय मिळविला असून, केवळ एकाच सामन्यात पराभवाचा सामना केला. तर उर्वरित चार सामने अनिर्णीत राहिले, तर सौराष्ट्र संघाने १४ ते १७ डिसेंबर २०१८ मध्ये एकमेव सामना महाराष्ट्र संघाविरुद्ध या मैदानावर खेळला आणि त्यात विजय मिळविला. त्यामुळे आतापर्यंत या मैदानावर महाराष्ट्र संघाचे पारडे जड राहिले असले तरी, सौराष्ट्र संघाकडून देखील जशास तसे उत्तर दिले जाण्याची शक्यता असल्याने, सामना चुरशीचा होणार आहे.
स्टार खेळाडूंचे आकर्षण
या सामन्यात भारतीय क्रिकेट संघ तसेच आयपीएल गाजविलेले स्टार खेळाडू खेळणार आहेत. सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकट हा या सामन्यातील आकर्षण असणार आहे. याशिवाय आयपीएल खेळलेले चेतन सकारीया, एच देसाई (यष्टीरक्षक), चिराग जानी, प्रेरक मांकड, अंश गोसाई यांच्याकडे देखील क्रीडाप्रेमींचे लक्ष असणार आहे. तर महाराष्ट्र संघातून पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, अर्शिन कुलकर्णी, सिद्धेश वीर, अंकित बावणे (कर्णधार), जलस सक्सेना, विकी ओस्तवाल, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी या स्टार खेळाडूंंचे आकर्षण आहे.
रणजी सामन्यांचे नाशिकला आयोजन म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरत असते. दरवर्षी क्रीडाप्रेमींचा उत्साह वाढता आहे. बीसीसीआयच्या निकषाप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. अधिकाधिक सामन्यांचे आयोजन करताना शहरातील क्रिकेट खेळाला आणखी प्रोत्साहन देण्याचा मानस आहे.
विनोद शहा, अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट असोसिएशन.