

नाशिक : संघातील खेळाडूंचा उंचावलेला खेळ आणि खेळपट्टीचा विचार करता जिंकण्याच्या निर्धारानेच मैदानात उतरणार असल्याचा निर्धार महाराष्ट्र आणि सौराष्ट्र संघाच्या कर्णधारांनी व्यक्त केला. शनिवार (दि. १) पासून सुरू होणाऱ्या रणजी सामन्याअगोदर शुक्रवारी (दि. ३१) आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही कर्णधारांनी स्पष्ट केले की, पावसाने साथ दिल्यास, सामन्याचा कौल आपल्याच बाजूने लावणार.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शनिवारी (दि. १) सकाळी ८.३० च्या सुमारास टॉस उडविला जाणार आहे. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र संघाचा कर्णधार अंकित बावणे याने, नाशिकमध्ये रणजी खेळणे संस्मरणीय असते. वेगळा संघ असल्याने, वेगळी ऊर्जा घेऊन जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहोत. मागच्या काळात काय झाले, याचा विचार न करता, आमचे पूर्ण लक्ष आताच्या मॅचवर असणार आहे. संघातील सर्व खेळाडू प्रतिभावान आहेत. संघात अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. दोन सामने आम्ही इतर राज्यांत खेळलो, आता घरच्या मैदानावर आलो आहे. सौराष्ट्र संघाचा पॅटर्न असून, त्यातूनच त्यांनी आतापर्यंत यश मिळविले आहे. याचाच विचार करून आम्ही मैदानात उतरणार आहोत. संघात 'फिअरलेस' वातावरण आहे. मागचा सामना गोलंदाजांनी जिंकून दिला होता. आता फलंदाजीही भक्कम असल्याचे तसेच सौराष्ट्र संघाचा दबाव नसून, ट्रॉफी उंचाविण्याचे स्वप्न असल्याचे त्याने स्पष्ट केले.
सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकट म्हणाला की, २०१८ मध्ये जेव्हा आम्ही या मैदानावर खेळलो, तेव्हा आम्ही चांगला खेळ केला होता. त्यात सातत्य राखण्याचा आमचा प्रयत्न आहे. संघातील प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास वाढलेला आहे. यापूर्वी कर्नाटक आणि मध्य प्रदेशच्या संघांविरुद्ध चांगला खेळ केला आहे. गोलंदाजांसह, फलंदाजही लयीत आहेत. खेळपट्टी चांगली असून, हवामानाची साथ अपेक्षित आहे. आम्ही डावपेच घेऊन मैदानात उतरणार आहोत. चार दिवसांचा खेळ असून, प्रत्येक दिवशी ९० षटकांचा खेळ होणार आहे. त्यामुळे संयम ठेवून कामगिरी उंचावण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे जयदेव म्हणाला.
तीन तास सराव
महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सकाळच्या सत्रात सुमारे तीन तास कसून सराव केला. प्रारंभी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हिरवळीवर फुटबॉलचा आनंद घेतला. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक शॉन विलम्स व सहायक प्रशिक्षकाबरोबर कर्णधार अंकित बावणे, ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ यांच्यासह इतर फलंदाज व सर्वच गोलंदाजांनी सराव केला. 10 च्या सुमारास सौराष्ट्र संघाने सरावाला सुरुवात केली. मुख्य प्रशिक्षक नीरज ओडेद्रा व इतर सहायक प्रशिक्षक यांच्यासह कर्णधार जयदेव उनाडकट, चेतन सकारिया यांनी सरावात सहभाग घेतला.
नाशिकचा रामकृष्ण घोष संघात
महाराष्ट्र संघात नाशिकच्या रामकृष्ण घोष याचा समावेश असून, त्यानेदेखील शुक्रवारी सरावात सहभाग घेतल्याने, नाशिकच्या क्रीडारसिकांनी आनंद व्यक्त केला. रामकृष्ण घोषच्या खेळाकडे नाशिककरांचे लक्ष असून, त्याच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.
क्रीडारसिकांना मोफत प्रवेश
सामना बघण्यासाठी मोफत सुविधा राहणार असून, त्र्यंबक रोडवरील सिव्हिल हॉस्पिटलसमोरील मुख्य द्वार तसेच गेस्ट हाउसकडील द्वाराने मैदानावर प्रवेश करता येणार आहे. पार्किंगसाठी ईदगाह मैदानाचा वापर करता येणार आहे. आतापर्यत फक्त परदेशात उपलब्ध असलेल्या लॉनवर बसून सामना बघण्याची सोय होती. आता नाशिककरांना खास टेकडावरील हिरवळीवर बसून सामना बघण्याचा आनंद लुटता येणार आहे.
नाशिकमध्ये प्रथमच खेळणार आहे. दबाव नेहमीच असतो, मात्र कामगिरी उंचावण्याचा आत्मविश्वास आहे. सौराष्ट्र संघाविरुद्ध बरेच क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल.
पृथ्वी शॉ, फलंदाज, महाराष्ट्र संघ
महाराष्ट्र, सौराष्ट्र संघाची २०२५-२६ मधील कामगिरी
यंदाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत एलिट ग्रुप बीमध्ये महाराष्ट्र व सौराष्ट्र संघांचे आतापर्यंत प्रत्येकी दोन सामने खेळून झाले आहेत.
महाराष्ट्र संघाने आतापर्यंत दोनपैकी पहिल्या सामन्यात केरळ विरुद्ध पहिल्या डावाच्या आघाडीवर, तर चंदिगड संघाविरुद्ध निर्णायक विजय मिळवला आहे. महाराष्ट्र संघाचे एकूण गुण ९ इतके असून, 8 संघांत महाराष्ट्र प्रथम स्थानावर आहे.
सौराष्ट्र संघाने 2 पैकी एका सामन्यात कर्नाटक विरुद्ध पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला, तर मध्य प्रदेशबरोबरचा सामना अनिर्णित राहिला. सौराष्ट्राचे एकूण ४ गुण असून, सध्या 8 संघांत पाचव्या स्थानावर आहेत.
या गटात इतर सहा संघांमध्ये गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक, पंजाब, केरळ, चंदिगड या संघांचा समावेश आहे.
खेळपट्टीवर गवत जास्त असल्याने, फिरकी गोलंदाजांना फारशी मदत मिळणार नाही. मात्र, वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकेल, अशी सध्या तरी स्थिती आहे. २०१८ मध्ये आम्ही या मैदानावर चांगला खेळ खेळलो होतो. त्यात सातत्य ठेवायचे आहे.
चेतन सकारिया, गोलंदाज, सौराष्ट्र संघ