

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड, नाशिक आणि कुशावर्त तीर्थ, त्र्यंबकेश्वर येथे होणारे ध्वजारोहण सोहळे सुरळीत पार पाडण्यासाठी गर्दी व्यवस्थापनावर भर दिला असून प्रशासनाने या सोहळ्यासाठी पास वितरण, आसनव्यवस्था, वाहतूक, पार्किंग, प्रवेश व निर्गमन मार्गाचे नियोजन करण्यासाठी गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्याचे निर्देश कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून सोपवलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ध्वजारोहण सोहळ्याच्या नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी प्राधिकरणाच्या समिती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील,
प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, रामकुंड व कुशावर्ततीर्थ येथील ध्वजारोहण सोहळ्यासाठी जनप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विविध संस्थांच्या प्रतिनिधींना प्रवेश देण्यासाठी पास वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे.
उपस्थांच्या संख्येनुसार विभागनिहाय आसनव्यवस्था निश्चित करत त्याचा आराखडा संबंधित कार्यालयांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. कार्यक्रमस्थळी प्रवेशद्वारे, निर्गमन मार्ग आणि बॅरिकेडिंगची व्यवस्था करताना गर्दीचे प्रभावी नियंत्रण होईल, याची दक्षता घेतली जाणार आहे.
रामकुंड येथे सायंकाळच्या गोदाआरतीवेळी भाविक व पर्यटकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन स्वतंत्र व्यवस्थापन आराखडा तयार करण्यावर चर्चा झाली. आरतीस्थळावरील प्रवेश व निर्गमन मार्ग, बॅरिकेडिंग आणि आपत्कालीन मार्ग खुले ठेवण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले.
ध्वजारोहण सोहळ्याच्या ठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनतळ, बसमधून उतरण्याचे ठिकाणे आणि कार्यक्रमस्थळापर्यंतच्या मार्गाचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला. शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सामूहिक बससेवेचा पर्याय विचारात घेऊन जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि अन्य कार्यालयांनी समन्वय साधावा, अशा सूचना देण्यात आल्या.
उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी दिशादर्शक फलक, पार्किंगची माहिती देणारे नक्शे आणि मार्ग स्पष्ट करणारे एनिमेटेड व्हिडिओ तयार करण्याबाबतही चर्चा झाली. दरम्यान, दोन्ही ठिकाणांची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन आसनव्यवस्था, माध्यम विभाग आणि बॅरिकेडिंगचा अंतिम आराखडा निश्चित केला जाणार आहे.