नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सीतागुंफा व काळाराम मंदिर परिसरात रामकाल पथ प्रकल्पांतर्गत काँक्रिटीकरण व सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, या कामामुळे २१ जानेवारीपासून पुढील ७० दिवस संबंधित मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत वाहतूक पर्यायी मागनि वळवण्यात येणार असल्याची अधिसूचना पोलिसांकडून जारी करण्यात आली आहे.
महापालिकेमार्फत सीतागुंफा, काळाराम मंदिर परिसरात रामकाल पथ प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणावर कॉक्रिटीकरण व सुशोभिकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामात दोन्ही बाजूंच्या दुकानांचे सीमेंट काँक्रीट करणे, काळाराम मंदिर परिसराचे सुशोभीकरण, काळाराम मंदिर ते सीतागुंफा दरम्यान पेव्हरब्लॉक बसवणे तसेच मालेगाव स्टॅण्डकडून रामकुंडाकडे येणाऱ्या रस्त्यावर कमान उभारण्याचा समावेश आहे.
या कामासाठी काळाराम मंदिराकडून सीतागुंफेकडे जाणारा रस्ता, काळाराम मंदिराच्या उत्तर, पूर्व व दक्षिण दरवाजासमोरील सर्व मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात शहर वाहतूक शाखेचे अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही अधिसूचना लागू करण्यात आली आहे.
संबंधित कामाच्या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी बॅरिकेडिंग, दिशादर्शक फलक, प्रवेश बंद काम सुरू आहे असे सूचनाफलक, रात्री पुरेसा प्रकाश, रिफ्लेक्टर, ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती बंधनकारक करण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास संबंधित ठेकेदार जबाबदार राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ही अधिसूचना २१ जानेवारी ते १ एप्रिल या ७० दिवसांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. अत्यावश्यक सेवा, रुग्णवाहिका, अग्रिशमन दल व पोलिस वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. अधिसूचनेचे उल्लंघन केल्यास मोटार वाहन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.