रामजन्मोत्सवात नाशिकमधील काळाराम मंदिरात श्रीरामाला सोन्याच्या मिशा, काय आहे परंपरा?

Ram Navami 2025 | Kalaram Mandir Nashik | रामनवमीनिमित्त काळाराम मंदिरात उत्सव
 Ram Navami 2025, Kalaram Mandir Nashik
नाशिक- पंचवटीतील प्रसिद्ध श्री काळारामाला सोन्याच्या मिशा लावण्यात आल्याने रामाचे रुप विलोभनीय दिसत आहे.(Pudhari Photo)
Published on
Updated on
नाशिक : अंजली राऊत

Ram Navami 2025 | Kalaram Mandir Nashik | पंचवटीतील प्रसिद्ध श्री काळारामाला सोन्याच्या मिशा लावण्यात आल्याने रामाचे रुप विलोभनीय दिसत आहे. चैत्र गुढीपाडवा (दि. 30 मार्च) ते रामजन्मोत्सवात दररोज उपचार महाअभिषेक झाल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र आणि श्री लक्ष्मण यांना सोन्याच्या मिशा लावल्या जातात. शेजआरतीनंतर या मिशा काढून ठेवल्या जातात.

दसरा, दिवाळी आणि रामनवमीनिमित्त काळारामाला सोन्याच्या दागिन्यांचा पारंपरिक साज दरवर्षी चढविला जातो. त्याचाच एक भाग म्हणून सोन्याच्या मिशा या श्रीराम यांना लावल्या जातात. रामजन्मोत्सवानिमित्त रविवार (दि.6) रोजी काळाराम मंदिरात उत्सव सुरू आहे. राजजन्मोत्सवानिमित्त मिशा लावण्यात आल्याने श्री रामरायाच्या विलोभनीय रुपाचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भक्त सकाळपासूनच हजेरी लावत आहेत.

का लावल्या जातात सोन्याच्या मिशा, इतिहास काय सांगतो?

यासंदर्भात वाल्मिकी रामायणातील एका संदर्भानुसार, प्रभू रामचंद्र जेव्हा दंडकारण्यात आले. ज्यावेळी शूर्पणखाचे नाक कापले गेले. त्यावेळी 14 हजार राक्षस श्रीराम यांच्यावर हल्ला करण्यासाठी आले असताना सर्व ऋषीमुनी भयभीत झाले. त्यांनी श्रीराम यांना विनंती केली. नरभक्षी राक्षसांपासून आमचे रक्षण करा. त्यावेळी प्रभू श्रीरांनी प्रतिज्ञा घेत सर्व राक्षसांचा वध करण्याचे सांगितले.

त्यावेळी खरदूषण, त्रीशिर, शूर्पणखा यांच्यासह रावणाचे महाबलाढ्य आणि क्रूर असे 14 हजार राक्षस दंडकारण्यात व विशेषतः पंचवटीत वास्तव्यास होते. देवांनादेखील दूर्जय असलेल्या या महाबलाढ्य राक्षस सेनेचा अजानबाहू प्रभू श्रीरामांनी अवघ्या दीड मुहूर्तात म्हणजेच 45 मिनिटांत वध केला. राक्षसांचा वध करतांना प्रभू श्रीराम यांना शस्त्र, आघात झाले. त्यांचा क्रोध अनावर होत असतांना श्रीरामाच्या चेहर्‍याकडे कुणी पाहू शकत नव्हते. ते राक्षसांचे साक्षात कालरुप भासत होते. म्हणून ते राक्षसांना दंड देणारे, शिक्षा करणारे काळराम आणि पुढे अपभ्रंश होऊन काळाराम शब्दप्रयोग होऊ लागला. श्रीरामाच्या जीवनात प्रथमच एवढा मोठा युद्धप्रसंग बंधू श्री लक्ष्मण यांच्यासमवेत गाजविला. या युद्धात त्यांनी पुरूषार्थाची पराकाष्ठा केली. वीर, शौर्य, तेज, उग्र असे सर्वच भाव श्रीरामाच्या चेहर्‍यावर प्रकटले होते. मिशीदेखील त्याच पराक्रमाचे प्रतिक. म्हणून रामाच्या मूर्तीस सोन्याची मिशी लावली जाते. त्यानुसार रामजन्मोत्सवात मिशा दाखवल्या जातात. तर ते पुरुषार्थाचे प्रतिक मानले जाते. भरदार मिशा असणारी व्यक्ती ही पराक्रमी, शौर्याचे प्रतिक असल्याचे मानले जाते. या उत्सवात प्रभू श्रीराम आणि श्री लक्ष्मण यांना सोन्याच्या मिशा लावल्या जातात. साधारण तीन इंच लांबीच्या या आकर्षक मिशा आहेत. असे वैशिष्ट्यपूर्ण असणारे हे एकमेव मंदिर आहे. सायंकाळी शेजआरतीवेळी मिशी काढल्यानंतर राम पुन्हा सुंदर शांत दिसतात, अशी माहिती नाशिकमधील काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास पुजारी यांनी दिली.

काळाराम मंदिराचा इतिहास असा…

काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर 1778-1790 मध्ये बांधले. येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत. मंदिरात नियमित पूजाअर्चा होते. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. मंडपात प्रवचने व कीर्तने होत असतात. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे.

मंदिराच्या बाहेरच्या बाजूने चार दरवाजे हे चार वेदांचे प्रतिक आहे. वर मंदिरात दरवाजे हे उपवेदांचे प्रतिक आहे. मंदिरात एकूण 84 कमानी आहेत. 84 मनुष्य जन्म असल्याचे ते प्रतिक आहे. प्रवेश केल्यावर श्री हनुमान यांचे मंदिर आहे. श्री हनुमान आपल्या लाडक्या रामाच्या चरणांकडे बघताना दिसतात. मंदिरात एकूण 40 खांब आहेत, ते हनुमान चालीसाप्रमाणे असून यजुर्वेदात 40 अध्याय आहेत. त्याप्रमाणे यजुर्वेदला समोर ठेवून श्रीरामांच्या स्तुतीसाठी येथे सज्ज झाले आहेत, असा भाव त्यामध्ये आहे. मंदिरासाठी चढतांना 14 पायऱ्या आहेत. मेघडंबरी जेथून भक्त श्रीराम यांचे दर्शन घेतले जाते ती मेघडंबरी एकूण 8 खांबांवर उभी आहे. त्यावरील 1008 पाकळ्या या सहस्त्रदल कमळाचे प्रतिक आहे. मंदिरात प्रभू रामचंद्र यांचा उजवा हात छातीवर आहे.

मंदिराच्या बांधकामासाठी दोन हजार कारागीर बारा वर्ष राबत होते. त्या काळात मंदिर बांधणीचा अंदाजे 23 लाख इतका खर्च आल्याचे सांगितले जाते. मंदिर परिसर 245 फूट लांब व 145 फूट रुंद आहे. मंदिर परिसराला 17 फूट उंच दगडाची भिंत आहे. मंदिराच्या चारही दिशांना चार दरवाजे आहेत. या मंदिराच्या कलशाची उंची 69 फूट इतकी आहे. पूर्व महाद्वारातून आत गेल्यावर भव्य सभा मंडप असून ज्याची उंची 12 फूट आहे आणि येथे चाळीस खांब आहेत.

रामजन्मोत्सव असा साजरा होतो…

रामजन्मोत्सवात सकाळी 5 वाजता काकड आरती होते. त्यानंतर राजोपचाराने पूजा केली जाते. दुपारी 12 वाजता रामजन्म संपन्न झाल्यावर साखर, फुटाणे व मिठाई, सुंठ आल्याचा प्रसाद, पंजिरी वाटले जाते. संध्याकाळी श्रीराम यांची आरती ही वैशिष्ट्यपूर्ण असून संपूर्ण वर्षात एकदाच रामजन्मोत्सवात केली जाते. अन्नकोट महानैवेद्य आरती असे त्यास म्हटले जाते. 56 प्रकारचे भोग प्रभू श्रीराम यांना दाखवले जातात. त्यानंतर रात्री श्रीराम यांची शयन आरती होते. कामदा एकादशीला गरुडरथ आणि रामरथाची भव्य यात्रा मिरवणूक परिसरातून काढली जाते. या रथयात्रेत ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या आणि सडामार्जन केले जाते. यावेळी संपूर्ण नाशिकनगरी ही नववधू सारखी सजवली जाते. सिंहस्थ कुंभमेळ्याचं प्रधान दर्शन हे नाशिकमधील काळाराम मंदिर होय.

रामनवमीपासून श्रीराम यांच्या पायावर सूर्यकिरणे पडतात. त्यामुळे रामनवमी पासून मंदिरात किरणोत्सव साजरा केला जातो. मंदिर परिसरात वाहनतळाचा (पार्किंगचा) प्रश्न आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे सोईचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news