

नाशिक : पंचवटीतील श्री काळाराम मंदिर ते गोदाघाट दरम्यान साकारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी 'राम काल पथ' प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तब्बल ८३.३५ कोटींचा खर्च केला जाणार आहे. या कामासाठी ७५.८८ कोटींचे प्राकलन तयार करण्यात आले होते. जादा दराची निविदा आल्यामुळे या प्रकल्पावरील तब्बल ७.४६ कोटींचा जादा खर्च महापालिकेच्या निधीतून करावा लागणार आहे.
येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यटन विभागामार्फत राम काल पथ प्रकल्पासाठी ९९.१४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पावर १४६.१० कोटींचा खर्च अपेक्षित असल्यामुळे उर्वरित ४६.९६ कोटींचा खर्च राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत तसेच नाशिक महापालिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे.
त्यानुसार पर्यटन विकास महामंडळाला प्रस्ताव सादर करण्यात आला असून, ४६.९६ कोटींचा निधी राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून उपलब्ध करून देण्याबाबत महासभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी गुजरातच्या एच. सी. पी. डिझाइन प्लॅनिंग ॲण्ड मॅनेजमेंट या एजन्सीची नियुक्ती प्रकल्प सल्लागार म्हणून झाली आहे. सल्लागाराच्या आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात रामकुंड व श्री काळाराम मंदिर परिसरातील पुरातन कालीन मंदिर व इमारतींची दुरुस्ती व नूतनीकरण तसेच जीर्णोद्धार करण्याचे सुमारे २२ कोटींचे काम सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी सल्लागार कंपनीने ७५.८८ कोटींचे प्राकलन तयार केले होते. त्यानुसार निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. स्कायवे इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. मुंबई या मक्तेदारामार्फत दुसऱ्या टप्प्यातील ८३.३५ कोटींचे काम केले जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.
रामकुंडालगतचे वादग्रस्त वस्त्रांतरगृह महापालिकेतर्फे पाडले जाणार आहे. राम काल पथ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात वस्त्रांतरगृहाची नव्याने उभारणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याखेरीज प्रवेशद्वार, आरकेड छत्री, कोबल, स्टोन वर्क, सॉलिड स्टोन वर्क, फ्लोअरिग फसाड वॉल, विद्युतीकरण, शौचालय आदी कामांचा समावेश आहे.