

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी 'राम काल पथ' प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील २२.५५ कोटींच्या कामांना महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या अंतर्गत गोदावरी नदीच्या तिरावरील पुरातन मंदिरे, इमारतीच्या दर्शनी भागातील दुरूस्ती, नुतनीकरण तसेच जिर्णोध्दार ही कामे केली जाणार आहेत.
केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाने नाशिकमध्ये १४६ कोटींच्या राम काल पथ प्रकल्पाच्या उभारणीला मंजुरी दिली आहे. यासाठी केंद्राकडून ९९.१४ कोटींचा निधी मिळणार आहे. तर, ४७ कोटींचा खर्च राज्य शासनाकडून केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात रामकुंड व काळाराम मंदिर परिसरातील पुरातनकालीन मंदिर व इमारतीची दुरूस्ती व नुतनीकरण तसेच जिर्णोध्दार करण्यासाठी महापालिकेने नेमलेल्या सल्लागार कंपनीने आराखडा तयार केला असून, त्यानुसार या कामाचे प्राकलन तयार करण्यात आले होते. त्यात स्टोन वर्क, ग्राऊंटींग, लाकडी स्ट्रस, स्टोन प्लोरिंग, मंगलोर टाईल्स, रेट्रा फिटींग, वीट बांधकाम, प्लास्टर व इतर आवश्यक लागणाऱ्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. या कामांसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मनपाला फेरनिविदा काढावी लागली होती. त्यात तीन मक्तेदारांनी सहभाग घेतला. त्यापैकी सवानी हेरिटेज कन्झरवेशन प्रा. लि. ही कंपनी पात्र ठरली असून, या मक्तेदार कंपनीला काम करण्यासाठी स्थायी समितीने मंजुरी दिली.