

नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांमधील घडामोडींना वेग आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतदेखील हालचाली वाढल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवार (दि. 26) आणि मंगळवार (दि. 27) असे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर येत असून, दौऱ्यात आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा आढावा घेणार असल्याची माहिती शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी दिली.
यापूर्वी राज ठाकरे यांचा दौरा दि. १५ आणि १६ मे रोजी निश्चित झाला होता. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी शहरभर होर्डिंग्जदेखील लावले होते. मात्र, अचानक त्यांचा दौरा रद्द झाला होता. आता ते सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर येत असून, दौऱ्यात आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबतचा आढावा घेणार आहेत. ते स्थानिक पदाधिकाऱ्यांसह, निवडक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
नाशिक हा कधी काळी मनसेचा गड होता. राज ठाकरे यांच्या नाशिकच्या नवनिर्माणाच्या सादेला प्रतिसाद देत नाशिककरांनी नाशिक महापालिकेची सत्ता मनसेच्या हाती सोपविली होती. नाशिकमधून मनसेचे तीन आमदारही निवडून दिले होते. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी आणि हेव्यादाव्यांमुळे पक्षाला मोठा फटका बसला. महापालिकेची सत्ता पुन्हा काबीज करण्याचा दावा करणाऱ्या मनसेचे २०१७ च्या निवडणुकीत अवघे पाच नगरसेवक निवडून आल्याने राज ठाकरे नाराज झाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता, तर गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने स्वतंत्र चूल मांडत राज्यभर उमेदवार दिले होते. मात्र, एकही जागा निवडून आणता आली नाही. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नव्या दमाने पुढे जाण्यासाठी मनसे सज्ज असून, पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने राज यांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
राज ठाकरे जेव्हा जेव्हा नाशिक दौऱ्यावर आले, तेव्हा बहुतांश वेळा त्यांनी दौरा आटोपता घेतल्याचे दिसून आले. यावेळीही त्यांचा दौरा दोन दिवसांचा सांगितला जात असला, तरी प्रत्यक्षात एकच दिवस ते नाशिकला थांबण्याची शक्यता आहे. पुणे येथे महत्त्वाची बैठक असल्याने, ते नाशिकचा दौरा आटोपता घेऊन पुण्याला रवाना होऊ शकतात.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मरगळ झटकण्याच्या उद्देशाने "राजगड'ची रंगरंगोटी केल्याने ते चकाचक दिसून येत आहे. मात्र, जोपर्यंत मने कलुषित झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये मनोमीलन होणार नाही, तोपर्यंत आगामी निवडणुकांचे मैदान मारणे मनसेला म्हणावे तितके सोपे नक्कीच नसणार आहे.