

सिन्नर (नाशिक) : मुंबई - पुणे - नाशिक या महत्त्वाच्या विकास त्रिकोणात सिन्नर हे केंद्रस्थानी असताना नाशिक - पुणे रेल्वेमार्ग सिन्नर, संगमनेरमार्गेच व्हावा, या मागणीसाठी सिन्नरकरांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूीवर बुधवारी (दि. 17) सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृहात सहविचार सभा आयोजित करण्यात आली आहे. पूर्वी नाशिक - पुणे रेल्वेार्ग सिन्नर, संगमनेरमार्गे होणार असल्याची अधिसूचना निघाली होती. त्यानुसार संबंधित जमिनींचे संपादनही झालेले आहे. मात्र, काही विशिष्ट घटकांच्या फायद्यासाठी हा मार्ग बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप आहे.
हा रेल्वेमार्ग सिन्नर संगमनेरमार्गे झाल्यास शिक्षण, व्यापार, उद्योग, शेती, शेतीपूरक व्यवसाय, दळणवळण तसेच नोकरदार वर्गाला मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे या विषयावर सखोल चर्चा सभेत करण्यात येणार आहे. बैठकीस सिन्नरमधील मान्यवर नागरिकांनी, विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सहविचार सभा माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, प्रा. राजाराम मुंगसे, हरिभाऊ तांबे, कृष्णा घुरे, दत्ता जोशी, गौरव घरटे, भाऊसाहेब शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली आहे.