Rabi Season : जिल्ह्यात रब्बी हंगामचा बदलतोय पॅटर्न !

दुष्काळी तालुक्यातही वाढतेय रब्बीचे क्षेत्र; उन्हाळ कांदा, गव्हासह मक्याच्या क्षेत्रात होणार वाढ
Sowing of rabi crops
रब्बीpudhari
Published on
Updated on

नाशिक, विकास गामणे

कालव्याचे पाणी, शेतकऱ्यांनी खोदलेल्या विहिरी व कुपनलिका तसेच अवर्षणप्रवण भागात झालेले हजारो शेततळे यामुळे जिल्ह्यातला रब्बीचा पॅटर्न वर्षागणिक बदलत आहे. यंदा पाण्याच्या उपलब्धतेमुळे जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. विशेषत: उन्हाळ कांदा, गहू, रब्बी, मका तसेच हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी, दुष्काळी भागातही निफाड, दिंडोरीप्रमाणेच बागायत फुलत असल्याचे चित्र आहे.

भौगोलिकदृष्या विचार करता जिल्ह्यातील अर्ध्यावरील तालुक्यामधील रब्बी हंगाम हा पावसावर अवलंबून असतो. विशेषत: दुष्काळी येवला, सिन्नर, मालेगाव, चांदवड नांदगाव तालुक्यांत खरिपातील मुसळधार पाऊस हाच रब्बीचा आधारवड ठरत असतो. दिवाळीच्या दरम्यान चांगला पाऊस होतो ते वर्ष रब्बीसाठी फलदायी असते. अन्यथा अर्धा जिल्हा रब्बीपासून कोसो दूरच असतो. येवला, मालेगाव, नांदगाव, सिन्नर या तालुक्यातील शेतकऱ्यांवर दर दोन-तीन वर्षांच्या आत एक वर्ष रब्बीच्या पिकावर पाणी सोडण्याची नामुष्की येते. भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्यातील रचना विषमतेची असून अनेक भागात कालव्याचे पाणी पोहोचलेले नाही. जोडीनेच सह्याद्रीच्या पर्वतरांगा, डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणात असल्याने या परिसरात फेब्रुवारीनंतर पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्रही अल्प आहे.

Nashik Latest News

Sowing of rabi crops
Latur News : रब्बी ज्वारीसाठी गारठा ठरणार वरदान

नाशिक जिल्हा तसा खरिपाचा असून खरिपाचे सरासरी क्षेत्र सहा लाख ४० हजार असताना रब्बीचे क्षेत्र मात्र एक ते सव्वा लाख हेक्टरच्या आसपास आहे, तर एक हजार ६३३ गावांपैकी जेमतेम ११० गावेच रब्बी हंगामाची असून दीड हजाराहून अधिक गावांची भिस्त ही खरीप हंगामावर अवलंबून असते. यंदा पावसाळा संपला तरी पाऊस सुरूच असल्याने रब्बीचा पीक पॅटर्न बदलताना दिसेल. सर्वत्र पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने रब्बीतील रांगडा कांद्यासोबतच उन्हाळ कांद्याच्या लागवडीखाली मोठे क्षेत्र गुंतवले जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आत्ताच कांदा रोपे देखील घेतली आहेत. पाणी उपलब्ध असल्याने गव्हासह हक्काचे उत्पन्न देणाऱ्या रब्बी मक्यातही यंदा मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः अवर्षणप्रवण व दुष्काळी भागात हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे.

असे आहे खरिपाचे पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
असे आहे खरिपाचे पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

अतिवृष्टीने कडक थंडी

जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे जितका पाऊस तितकी कडक थंडी असते. यंदा पावसामुळे जास्त थंडी पडणार आहे. सध्या गुलाबी थंडीही सुटल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तापमानातील घट फळपिकांना फार घातक ठरते. पिकांच्या आणि फळांच्या पेशी आकुंचन पावण्याची क्रिया स्वसंरक्षणार्थ होते. थंडीचा कालावधी चांगला असल्यास एकूण गव्हाचा हरभऱ्याचा उतारा चांगला येतो, पिकाची वाढ चांगली आणि उत्पादन व उत्पादकतेत वाढ होते. ज्वारी व हरभऱ्याच्या पिकाच्या फायद्यासाठी थंडीचा जोर फायद्याचा आहे.

कांदा क्षेत्र वाढणार

दोन वर्षांपूर्वी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने गतवर्षी कांद्याचे क्षेत्र वाढले होते. यंदा कांद्याचे भाव टिकून नसले तरी आता हे पिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आवडते झाले आहे. जिल्ह्यात खरीप लाल, रब्बीचा रांगडा व उन्हाळी कांद्याची तब्बल दोन ते अडीच लाख हेक्‍टरवर लागवड होते. भावात सद्या मंदी असली तरी उन्हाळा कांदा चाळीत साठवता येतो तर शेवटी कांद्याच्या भावात नक्कीच तेजी दिसते हा फायदा घेण्यासाठी उन्हाळ कांद्याची लागवड क्षेत्र वाढणार आहे. निफाड, दिंडोरी, कळवण सटाणासह दुष्काळी देवळा, येवला, मालेगाव, सिन्नर, नांदगाव आदी तालुक्यात उन्हाळ कांद्याचे पिक शेतकरी घेत असून दिवसेंदिवस या भागात कांद्याचे क्षेत्र वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news