

नाशिक : निफाड तालुक्यातील नैताळे येथील कोट्यवधी रुपयांच्या गायरान जमीन घोटाळ्याची चौकशी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा स्वतः करणार आहेत. या प्रकरणात 'पुढारी न्यूज'ने केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला अधिकृत चौकशीचे आदेश दिले आहेत.
नैताळे गावात गायरान जमिनीच्या बोगस खरेदीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पंचांच्या वारसांकडून अधिकार नसतानाही परस्पर खरेदी-विक्री करून जवळपास १२ हेक्टर १५ आर म्हणजे सुमारे ३० एकर गायरान जमीन लाटल्याचा प्रकार 'पुढारी न्यूज'ने उघडकीस आणला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पंचांच्या वारसांना आपण विक्री करत असल्याचा थांगपत्ताही नव्हता. तोकडी रक्कम आणि वेगळी कारणे देऊन संशयित राजेंद्र बोरगुडे यांनी फसवणूक केल्याची भावना व्यक्त केली होती. दरम्यान, या घोटाळ्याविरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या गायरान देणाऱ्यांच्या वारसांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ आणि 'पुढारी न्यूज'चे आभार मानले आहेत.
इंग्रज काळातील कराराचा संदर्भ (चौकट)
१९२८ साली महादू, सहादू आणि पुंजा बोरगुडे या त्रयींनी गावातील जनावरांच्या चारणासाठी आपल्याकडील सर्व्हे नं. ७५ व ७६ ही जमीन गायरान म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला होता. या जमिनीवर कोणत्याही प्रकारचा खासगी वापर करता येणार नाही, असा स्पष्ट उल्लेख करारनाम्यात करण्यात आला होता. त्यावेळी २१ पंचांची नेमणूक करून त्यांच्याकडे केवळ देखरेख करण्याचा अधिकार देण्यात आला होता. १९८९ साली असाच परस्पर विक्रीचा प्रकार गायरान जमीन देणाऱ्यांच्या वारसांनी हाणून पाडला होता. तत्कालीन तहसीलदारांनी त्यावेळी तत्कालीन नोंदी रद्द करून पुन्हा २१ पंचांची नावे लावली होती.
गेल्या काही वर्षांत पंचांच्या वारसांनी या गायरान जमिनीची खरेदी- विक्री सुरू केली. आतापर्यंत २०१७, २०२३, २०२४ आणि २०२५ या चार वर्षांमध्ये एकूण १२.१५ हेक्टर जमीन राजेंद्र बोरगुडे यांच्या विविध नातेवाइकांच्या नावावर विकण्यात आली आहे. विशेष म्हणजे या खरेदीदारांमध्ये राजकीय बळ असलेली व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांचाच समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
शनिवारी (दि. १४) जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात याबाबत उच्चस्तरीय बैठक झाली आणि चौकशीस गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता या प्रकरणाला अधिकृत चौकशीचा औपचारिक प्रारंभ मिळाला आहे.
या घोटाळ्यात ३० एकर गायरान जमीन बोगस खरेदीखतांद्वारे लाटल्याचा आरोप अजित पवारांचे निष्ठावान कार्यकर्ते राजेंद्र बोरगुडे यांच्यावर करण्यात आला आहे. जमिनीचे बाजारमूल्य कोट्यवधी रुपयांचे असल्याने या व्यवहारामुळे मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय निर्माण झाला आहे.
या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, भूमिअभिलेख कार्यालयातून या व्यवहाराची संपूर्ण फाइलच गहाळ झाली आहे. ही फाइल नेमकी कशी आणि कुणाच्या सांगण्यावरून गायब झाली, याची सखोल चौकशी केली जाणार आहे.
नैताळे गायरान जमीन गैरव्यवहाराची बातमी 'पुढारी न्यूज'ने सर्वप्रथम उघडकीस आणली होती. त्यानंतर मंत्री व प्रशासनाच्या स्तरावर ही बाब गांभीर्याने घेतली गेली. आता जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू होणार असल्याने दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.