

नाशिक : किरण ताजणे
जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे गावात गायरान जमिनीच्या बोगस खरेदीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पंचांच्या वारसांकडून अधिकार नसतानाही परस्पर खरेदी-विक्री करून जवळपास १२ हेक्टर १५ आर म्हणजे सुमारे ३० एकर गायरान जमीन लाटल्याचा गंभीर आरोप निफाड पोलिसांत दाखल फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणी प्रशासकीय चौकशीची मागणी गायरान जमीन देणाऱ्या कुटुंबाच्या वारसांनी केली आहे
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, १९२८ मध्ये महादू, सहादू आणि पुंजा बोरगुडे या तिघांनी त्यांच्याकडील सर्व्हे नं. ७५ व ७६ ही जमीन गावातील जनावरांच्या चारणासाठी गायरान म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला होता. या जमिनीवर कोणत्याही प्रकारचा खासगी वापर करता येणार नाही, असा स्पष्ट उल्लेख करारनाम्यात होता. त्यावेळी २१ पंचांची नेमणूक करून त्यांच्याकडे केवळ देखरेख करण्याचा अधिकार देण्यात आला होता. मात्र, गेल्या काही वर्षांत पंचांच्या वारसांनी या गायरान जमिनीची खरेदी-विक्री सुरू करून आतापर्यंत २०१७, २०२३, २०२४ आणि २०२५ या चार वर्षांमध्ये एकूण १२.१५ हेक्टर जमीन लाटली. विशेष म्हणजे या खरेदीदारांमध्ये राजकीय बळ असलेले व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांचाच समावेश आहे. या प्रकरणात प्रमुख संशयित म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष तथा लासलगाव बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरगुडे यांचे नाव घेण्यात आले आहे तसेच खरेदीदारांमध्ये त्यांच्या पत्नी, भावजय, भाऊ आणि मेव्हण्याचा समावेश आहे. त्यामुळे ही बोगस खरेदी संगनमत आणि राजकीय दबावातून झाल्याचाही आरोप तक्रारदार रतन बोरगुडे, बापू बोरगुडे, महेश बोरगुडे यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाची फाइलच भूमी अभिलेख कार्यालयातून गायब झाल्याचे समोर आले आहे. कर्मचाऱ्यांची चौकशी करूनही फाइल मिळाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महसूलमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावेत, अशी गायरान जमीन देणाऱ्या वारसांनी केली आहे. दरम्यान, उपनिबंधक दीपाली जगताप यांनी याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
गायरान खरेदी-विक्री प्रकरणी आहवाल मागविला आहे. चौकशीतून काय समोर येते त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.
विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड
कोणतीही गैरप्रकार केलेला नाही. सगळ्या खरेदी कायदेशीर आहेत. तसेच बंदूक घेऊन फोटो काढल्याचा आरोपही चुकीचा आहे. माझ्याकडे बंदुकीचे लायसन्स आहे.
राजेंद्र बोरगुडे, संचालक, बाजार समिती, लासलगाव