

नाशिक : नाशिकमध्ये ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, आतापर्यंत तब्बल ५२ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. सायबर तज्ज्ञांच्या मते, सतर्कता, तांत्रिक साधनांचा योग्य वापर आणि योग्य माहिती यामुळेच नागरिक स्वतःला अशा गुन्ह्यांपासून वाचवू शकतात. डिजिटल सुरक्षितता ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असल्याचे पोलिसांनी सांगितले असून, फसवणूक झाल्यास १९३० किंवा १९४५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पूर्वी बँक मॅनेजर हा मित्रासारखा मानला जायचा; मात्र तंत्रज्ञानाच्या झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे नागरिक आणि बँक यांच्यातील थेट संवाद कमी झाला आहे. ऑनलाइन सेवांच्या वाढीमुळे बँकेत जाण्याची गरज कमी झाली आणि सर्व्हिस सेंटरची संकल्पना आली. तंत्रज्ञानाने कामे सुलभ केली, पण त्याचाच गैरवापर करून काहीजण नागरिकांची फसवणूक करत आहेत.
अलीकडच्या काळात शेअर बाजार गुंतवणूक, डिजिटल टास्क, टेलिग्राम, फेडएक्स, स्वाईप, सोशल मीडिया यांसारख्या माध्यमांतून फसवणुकीच्या घटनांत वाढ झाली असून, यात सुशिक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या जाणकार नागरिकही बळी पडत आहेत.
५८ कोटींची देशातील सर्वात मोठी डिजिटल फसवणूक
मुंबईत अलीकडेच एका ७२ वर्षीय नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली तब्बल ५८.१३ कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना देशातील सर्वात मोठी डिजिटल फसवणूक मानली जात आहे. तपासात असे समोर आले आहे की, अनेक हल्ले आंतरराष्ट्रीय स्तरावरून विशेषतः चीनसारख्या देशांमधून केले जात आहेत. हॅकर्स घरबसल्या लोकांना फसवतात आणि बँक खात्यांचा गैरवापर करतात.
मुख्य आकडेवारी आणि ट्रेंड
जानेवारी ते मे २०२५ दरम्यान ९.५ लाखांहून अधिक सायबर तक्रारी नोंदल्या गेल्या.
एकूण नुकसान सुमारे १,७५० कोटींपेक्षा अधिक झाले आहे.
दिल्लीमध्ये ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुमारे १,००० कोटींची फसवणूक झाली असून, पोलिसांनी त्यातील सुमारे २० टक्के रक्कम परत मिळवली आहे.
उत्पादन, विमान वाहतूक आणि सार्वजनिक क्षेत्रांवर रॅन्समवेअर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.
सरकारने उचललेली पावले
एफएफआरआय प्रणाली : टेलिकॉम विभागाने मे महिन्यात सुरू केलेल्या या प्रणालीमुळे २२८ कोटींची फसवणूक टळली असून, १०.३१ लाख बँक खाती गोठवली गेली आहेत.
‘रिपोर्ट अँड चेक सस्पेक्ट’ पोर्टल : गृह मंत्रालयाने सुरू केलेल्या या पोर्टलमुळे नागरिकांना संशयास्पद स्कॅमर ओळखता येतात आणि फसवणूक टाळता येते.
किराया खाते फसवणुकीचे नवीन उपकरण
ऑनलाइन फसवणुकीसाठी आता ‘किराया खाते’ हे गुन्हेगारांचे प्रमुख साधन बनले आहे. फसवणूक झालेली रक्कम ठेवण्यासाठी काही लोक आपले बँक खाते भाड्याने देतात. त्याबदल्यात त्यांना १० ते २० टक्के कमिशन मिळते. विशेष म्हणजे, तरुण वर्गच या आमिषाला सर्वाधिक बळी पडत आहे..
गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी
गुन्हेगार गरजू किंवा लालसेने प्रेरित व्यक्तींना लक्ष्य करतात. त्यांना नवीन सिमकार्ड देऊन, त्याच क्रमांकावर बँक खाते उघडले जाते. खाते उघडण्यासाठी आधार व पॅन लिंक केले जाते, परंतु नियंत्रण मात्र गुन्हेगारांकडेच राहते. त्यानंतर त्या खात्यांवरून व्यवहार करून पैसे काढले जातात. तपास सुरू झाल्यावर खोटा आरोप खातेदारावरच येतो.
तपासातील अडचणी अशा...
खातेधारकाला रक्कम हस्तांतरित झाल्याची कल्पनाच नसते.
कायमचा व पत्रव्यवहाराचा पत्ता वेगळा दिल्याने माहिती मिळवणे कठीण जाते.
नोंदणीकृत मोबाइल क्रमांक वेगळ्या व्यक्तीचा असतो.
खातेदाराने खाते भाड्याने दिले की तोही फसवला गेला हे सिद्ध करणे कायदेशीरदृष्ट्या गुंतागुंतीचे ठरते.
‘डिजिटल अरेस्ट’च्या घटनांमध्ये वाढ
नाशिकसह राज्यभर ‘डिजिटल अरेस्ट’ नावाच्या नव्या फसवणूक तंत्राने प्रचंड उचल घेतली आहे. गुन्हेगार स्वतःला सीबीआय, ईडी किंवा पोलिस अधिकारी म्हणून सादर करतात आणि पीडितांना सांगतात की त्यांच्या नावावर गुन्हा दाखल आहे. काहींच्या पार्सलमध्ये ड्रग्ज किंवा बनावट चलन सापडल्याचे खोटे कारण देऊन भीती दाखवली जाते. नंतर व्हिडिओ कॉलद्वारे चौकशी घेतली जाते, सरकारी बॅनर आणि पोलिस गणवेश दाखवून दबाव आणला जातो. पीडितांकडून जामिनासाठी खाते क्रमांक मागवून काही मिनिटांतच खाते रिकामे केले जाते. काही वेळा गुन्हेगार व्हॉट्सॲप किंवा स्काईपवर सतत कॉलवर ठेवून पीडितांना घाबरवतात.
‘एम-कवच २’ ॲपद्वारे फसवणूक टाळा
एम-कवच २ हे भारत सरकारच्या सी-डॅक संस्थेने विकसित केलेले मोफत अँड्रॉइड मोबाइल सुरक्षा ॲप असून, हे नागरिकांना सायबर फसवणूक आणि डेटा चोरीपासून संरक्षण देते. हे ॲप धोकादायक ॲप्स ओळखते, डेटा सुरक्षित ठेवते आणि गोपनीयतेचे संरक्षण करते. तसेच वापरकर्त्यांना त्यांच्या स्मार्टफोनचा सुरक्षित वापर करण्याचे मार्गदर्शन करते.
एम-कवच २ ची प्रमुख वैशिष्ट्ये
फोनच्या सेटिंग्जमधील त्रुटी शोधते.
ओटीपी गळती टाळण्यासाठी सूचना सेटिंग्ज व पासवर्ड संरक्षण तपासते.
ॲप्स अपडेट करण्याचा सल्ला देते.
डिव्हाइसवरील जाहिरात-आधारित मालवेअर (Adware) ओळखते.
नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्यावी, विशेष करून ज्येष्ठ नागरिकांनी कुणाचा धमकीचा फोन आल्यास घाबरून जाऊ नये, घरातील इतर सदस्यांशी चर्चा करावी. त्याशिवाय आपली माहिती व ओटीपी संबंधितांना देऊ नये तसेच तात्काळ पोलिस विभागात तक्रार करावी.
संदीप मिटके, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा नाशिक शहर
आपले केवायसी कागदपत्र देताना अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या बँक खात्याची वारंवार अपडेट घेणे आवश्यक आहे.
नागेश मोहिते, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर नाशिक ग्रामीण
केवायसी संदर्भातील माहिती कोणीही फोनवर मागू शकत नाही, जर अशी मागणी होत असेल तर समजावे काहीतरी गैर आहे. त्यामुळे फोनवर कोणालाही वैयक्तिक माहिती देऊ नये. ऑनलाइन फसवणूक झाल्यास तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.
संजय पिसे, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे नाशिक शहर